जळगाव : जिल्ह्यात आज मंगळवारी (दि.२७ जानेवारी) दुपारी गारपीटसह अवकाळी पावसाने मोठा कहर केला. परिणामी अनेक भागांमध्ये झाडे कोसळली, विजेचे खांब वाकले, स्ट्रीट लाइटसह बॅनर तुटून पडले तर अनेक भागांत शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
धरणगावात अवकाळी पावसाचा कहर
धरणगाव तालुक्यात या अनपेक्षित संकटामुळे गहू, मका, हरभरा, केळी, पपई यांसारखी प्रमुख पिके मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाली आहेत. वादळी वाऱ्याने उभी पिके आडवी झाली, तर काही ठिकाणी फळबागाही मोडीत निघाल्या. यामुळे आधीच कर्जबाजारीपणा, वाढता खर्च आणि बाजारातील अनिश्चिततेने त्रस्त असलेला बळीराजा अक्षरशः कोलमडून पडला आहे.
शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू
अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली. मात्र हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या रुद्र तांडवात हिरावून गेल्याने भिजलेली रब्बी पिके पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. विशेषतः कापणीस तयार असलेली पिके भिजल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात असून अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तातडीने पंचनामा करावा
शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी शिवाजी बाबुराव देशमुख यांच्यासह तालुक्यातील पीडित शेतकऱ्यांनी केली आहे.
चुंचाळे, गणपूर परिसरातही अवकाळीचा तडाखा
चोपडा तालुक्यातील चुंचाळे, गणपूर परिसरातही शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लगतच्या शिरपूर तालुक्यातील बभळाज, अजनाड, सावेर, महादेव दोंडवाडे, चुंचाळे, मामलदे आदी भागात मध्यम पावसासह बोरे व लिंबू एवढ्या गारांसह पाऊस पडला. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.








