Varangaon News: भुसावळ तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या वरणगाव शहरातील रेल्वे स्टेशनवर सुविधांचा अभाव आहे. यासह सिद्धेश्वर नगरकडे जाणाऱ्या पुलाखाली पाणी साचत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात वरणगाव नगरपरिषदेचे शिवसेना (शिंदे गट) नगरसेवकांनी शनिवार 14 फेब्रुवारी 2026 रोजी भुसावळ रेल्वेचे डीआरएम पुनित अग्रवाल यांना निवेदन दिले. मात्र, लोकप्रतिनिधींच्या या मागण्यांकडे डीआरएम यांनी सप्शेल पाठ फिरविली. डीआरएम यांच्या हा मुजोरपणा असल्याचे म्हणत शिवसेना नगरसेवकांनी निषेध नोंदविला आहे.
दरम्यान, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा वाहतुकीसाठी नवीन रेल्वे लाईन टाकण्यात येत आहे. त्यासंदर्भातील पाहणीसाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे डीआरएम पुनित अग्रवाल हे वरणगाव रेल्वे स्टेशनवर आले होते. दरम्यान, त्यांनी वरणगाव रेल्वे स्टेशन व परिसरातील 3 रेल्वे पुलांची पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, विनोद झोपे, अशफाक शाह, मिलिंद मेढे, सगीर शाह यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी डीआरएम यांना निवेदन देवून वरणगाव ते सिद्धेश्वर नगरापर्यंत असलेल्या पुलाची पाहाणी करुन पुलाखाली साचणाऱ्या पाण्याची समस्या सोडवावी. तसेच वरणगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी अवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, एक्स्प्रेस गाड्यांना वरणगाव स्टेशनवर थांबा मिळावा, आरक्षण खिडकी सुरु करण्यात यावी, प्रवाशांसाठी प्रवाशी शेड उभारावे अशा विविध मागण्या केल्या. मात्र, या समस्या आणि लोकप्रतिनिधी असलेल्या नगरसेवकांच्या मागणीकडे डीआरएम यांनी दुर्लक्ष करत काढता पाय घेतला असा आरोप शिवसेना नगरसेवकांनी केला. तसेच डीआरएम यांची ही भुमिका आडमुठेपणाची असल्याचे म्हणत नगरसेवकांनी डीआरएम यांचा निषेध केला आहे.
वरिष्ठांकडे तक्रार करणार
कोरोना काळात वरणगाव स्टेशनवर ज्या रेल्वेगाड्या थांबत होत्या त्यांना पुन्हा थांबा द्यावा. तसेच वरणगाव ते सिद्धेश्वर नगरापर्यंत असलेल्या पुलाखाली पाणी साचत असल्याने ही समस्या दुर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी डीआरएम यांना विनंती केली. मात्र, डीआरएम यांनी लोकप्रतिनिधींच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी पाठ पुरावा करीत असतात मात्र, भुसावळ डीआरएम यांना सामान्य नागरिकांशी काही घेणेदेणे नाही असे त्यांच्या वागण्यावरुन दिसतंय. त्यामुळे अशा मुजोर अधिकाऱ्यास समज द्यावी, यासाठी वरिष्ठ पातळीपर्यंत तक्रार करणार असल्याचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, मिलिंद मेढे यांनी ‘शौर्य मराठी’शी बोलताना सांगितले.
(भुसावळ विभागातील बातम्या तसेच जाहिरातींसाठी संतोष माळी- मो. क्रं. 9673151726, 8830123557 यांच्याशी साधावा.)








