Jalgaon Weather : जळगाव जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल जाणवत आहे. तापमानाचा पारा थेट ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. अशात आणखी दि. १३ जानेवारीनंतर काहीसे ढगाळ वातावरण; उष्णतेत घट होऊन थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या महिन्यापासून उत्तरेकडून सातत्याने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तापमानात थोडा चढ-उतार दिसून आला होता. सोमवारी १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच तापमानात झपाट्याने घट होत शनिवारी पहाटे ८.१ अंशांपर्यंत पारा घसरला. रविवारी (दि. ११) जळगावचे किमान तापमान १०.८ अंशांवर होते.
दिवसाही जाणवतोय गारवा
यंदा थंडीचा प्रभाव केवळ रात्रीपुरता मर्यादित न राहता दिवसाही गारवा जाणवत आहे. पहाटे व सकाळच्या वेळी धुके, थंड वारे आणि बोचरी थंडी यामुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. मागील महिन्यातही तापमान ७ अंशांपर्यंत खाली आले होते, त्यामुळे यंदाचा हिवाळा अधिक तीव्र असल्याचे स्पष्ट होत आहे.
पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज
हवामानाच्या सद्यःस्थितीनुसार पुढील काही दिवस थंडीचा माहोल कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेच्या लाटा आणि स्वच्छ आकाश यामुळे तापमानात फारशी वाढ होणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वाढती थंडी गहू, हरभरा आणि कांदा या रब्बी पिकांसाठी पोषक ठरत असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी दिली. थंड हवामानामुळे पिकांची वाढ चांगली होत असून, उत्पादनवाढीसाठी ही परिस्थिती अनुकूल आहे.









