JMC Election : जळगाव मनपाच्या निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे तापले असून, शहराचे राजकीय केंद्र आता पिंप्राळा परिसराकडे सरकले आहे. महायुतीने सुरुवातीलाच १२ जागा बिनविरोध जिंकून आघाडी घेतली असली, तरी पिंप्राळ्यातील ८ जागांवर महाविकास आघाडीने तगडे आव्हान उभे केल्याने महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
विशेषतः महायुतीचाही प्रचाराचा नारळ यंदा पिंप्राळा गावातून फोडण्यात आला. गेल्या निवडणुकीत पिंप्राळ्यात भाजपला शत-प्रतिशत यश मिळाले होते. मात्र, या यशाचे गणित ५० टक्के पक्षीय ताकद आणि ५० टक्के स्थानिक उमेदवारांची वैयक्तिक लोकप्रियता असे होते. यंदा हेच समीकरण बदलले आहे.
गेल्या वेळी भाजपसोबत असलेले काही तगडे स्थानिक उमेदवार आता महाविकास आघाडीच्या तंबूत दाखल झाले आहेत, तर काही जुन्या चेहऱ्यांनी महायुतीची साथ कायम ठेवली आहे.
यामुळे पिंप्राळ्याची लढत काटे की टक्कर ठरणार आहे. निवडणुकीच्या या धामधुमीत केवळ विकासकामांची चर्चा नसून जातीय समीकरणे जुळवण्यावर दोन्ही आघाड्यांचा भर आहे.
पिंप्राळ्यातील आठही जागांवर निकाल कोणत्याही बाजूने लागू शकतो, इतकी चुरस निर्माण झाली आहे. पिंप्राळा गावठाणचा बहुतांश भाग हा प्रभाग ८ आणि प्रभाग ९ मध्ये येतो. या दोन्ही प्रभागांत मिळून एकूण आठ नगरसेवक निवडून येणार आहेत. या जागांसाठी होणाऱ्या लढती जळगाव शहरातील इतर लढतींपेक्षा अधिक लक्षवेधी ठरणाऱ्या आहेत.
महाविकास आघाडीची जोरदार फिल्डींग
गत निवडणुकीपासून पिंप्राळा हा भाजपाचा बालेकिल्ला होता. आता बालेकिल्ला सुरक्षित ठेवण्यासाठी महायुतीने प्रचाराचा नारळ याच ठिकाणाहून फोडत जाहीर सभा देखील घेतली.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीने महायुतीला पराभूत करण्यासाठी या प्रभागात जोरदार फिल्डींग लावली आहे. त्यामुळे पिंप्राळ्याचा निकाल काय लागतो याकडे शहराचे लक्ष लागले आहे.









