धुळे : शहरातील देवपूर भागात ‘आम्ही पोलीस आहोत’ अशी बतावणी करून एका वृद्ध महिलेला लुटल्याची घटना दि. १७ रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास देवपूर भागात घडली. याप्रकरणी सोमवारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी कल्पना संजय जोशी (वय ५८, रा. ऋषी कॉलनी, देवपूर) या दि. १७ रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास देवपूर भागातून पायी जात होत्या. यावेळी हॉटेल सुरुची ते हॉटेल आकाश दरम्यानच्या रस्त्यावर तीन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यातील दोघांनी अंगावर जॅकेट घातलेले होते, तर एकाने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला होता.
आरोपींनी आपण पोलिस असल्याची बतावणी केली. “पुढे तपासणी सुरू आहे, तुम्ही अंगावर दागिने का घातले आहेत? ते काढून पिशवीत ठेवा,” असे सांगून त्यांनी जोशी यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जोशी यांनी त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि २ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढली.
यावेळी भामट्यांनी हातचलाखी करून सुमारे ६४ हजार रुपये किमतीचे हे दागिने लंपास केले आणि तिथून पळ काढला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कल्पना जोशी यांनी देवपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. देवपूर अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पोलिस अधिकारी सी. डी. बोरसे करत आहेत.








