Jalgaon weather : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून, आता थंडीचा जोर अधिक तीव्र झाला आहे. अशात आगामी काही दिवस असाच गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
जिल्ह्यात दिवसाचा पारा २९ अंश इतका होता. मात्र, काल हेच तापमान २६ अंशांपर्यंत घसरले होते. ढगाळ वातावरण आणि ताशी १५ ते २० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
साधारणपणे रात्री थंडी जास्त असते. मात्र, सध्या जिल्ह्यात विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे रात्रीचे तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले असले, तरी दिवसाचे तापमान थेट २६ अंशांवर खाली आले आहे.
पुढील ४८ तास महत्त्वाचे
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत जिल्ह्याचा किमान पारा १० ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. मात्र, वाऱ्याचा वेग जास्त असल्याने जरी तापमान १० अंशांच्या पुढे राहील तरी प्रत्यक्ष जाणवणारा गारठा अधिक राहण्याची शक्यता आहे.
विशेषतः सकाळी दाट धुक्याची चादर पसरणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे महामार्गावर सकाळच्या वेळी दृश्यमानता कमी होण्याची शक्यता असल्याने वाहनधारकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











