जळगाव : अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हतनूर धरणातून आलेली बातमी मोठा दिलासा देणारी ठरली आहे. रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून शेती सिंचनाकरिता दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे सुमारे ७००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, अशी माहिती हतनूर धरणाचे उपअभियंता यांनी दिली.
दुसऱ्या आवर्तनाचे पाणी संबंधित वितरिकांमधून सोडण्यात आले असून, ज्या वितरिकांपर्यंत पाणी पोहोचते आहे, त्या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाणी भरून घेतले आहे.
कालव्यालगतच्या शिवारांमध्ये अनेक शेतकरी मशीनच्या सहाय्याने पाणी उचल करून शेतात सोडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता.
पाणी मिळण्यासाठी अर्ज भरणे अनिवार्य
पाणी उपलब्ध झाले असले तरी प्रशासनाने याबाबत नियमावली अधिक कडक केली आहे. अनेकवेळा पाणी बांधावर आले की काही शेतकरी परवानगी न घेता वितरिकेतून पाणी उचल करतात.
याबाबत प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या असून, ज्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी घ्यायचे आहे, त्यांनी संबंधित विभागात अधिकृत पाणी मागणीचा अर्ज भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा वितरिका कर्मचाऱ्यांनी शेतशिवारात जाऊन पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेणे आवश्यक राहणार आहे.









