जळगाव : शहरालगत गिरणा नदीवरील बांभोरी पुलाच्या बांधकामासाठी केंद्र सरकारकडून सुमारे ७९ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे काम करण्यात येणार असल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली.
गिरणा नदीवरील सध्याचा पूल जीर्ण अवस्थेत असून वाढत्या वाहतूक कोंडीमुळे तो वाहनधारकांच्या डोक्याला मोठा ताप ठरला होता. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका तसेच वेळेचा अपव्यय सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर जुन्या पुलाच्या जागी नवीन, मजबूत आणि आधुनिक पूल उभारण्याची मागणी खासदार वाघ यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने लावून धरली होती. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, गिरणा पुलाच्या बांधकामासाठी ७९ कोटी २३ लाख ३९ हजार ६४८ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
जुन्या पुलाची विशेष दुरुस्ती
नवीन पुलाच्या बांधकामासोबतच सध्याच्या जुन्या पुलाची विशेष दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय कालिका माता मंदिर ते खोटेनगर रस्त्याचे व्हाईट टॉपिंग पद्धतीने कॉक्रिटीकरण, आरसीसी गटारीचे बांधकाम तसेच इतर पूरक विकास कामांनाही गती मिळणार आहे.
या सर्व कामांमुळे शहरातील अंतर्गत रस्ते अधिक सुस्थितीत येऊन नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. गिरणा नदीवरील जुन्या पुलास समांतर असणाऱ्या बांभोरी आणि निमखेडी दरम्यानच्या नवीन पुलाचे कामही काही महिन्यांपासून सुरू आहे. त्याच्या बांधकामासाठीही सुमारे ४० कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे.









