Central Railway : मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्धच्या मोठी कारवाई केली आहे. आरपीएफने अमली पदार्थांच्या तस्करीच्या सिंडिकेटचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत 12.82 लाख रुपये किमतीचे 43 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
नागपूर आरपीएफ पथकाने 6 फेब्रुवारी 2026 रोजी केलेल्या कारवाईत, ड्रग्ज तस्करीचा भांडाफोड केला आणि 3.72 लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले. 1 निरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक आणि 2 आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावर देखरेख कर्तव्यादरम्यान, संशयावरून दोन बॅगा घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. बॅगांची तपासणी केली असता त्यात 24.80 किलो वजनाचे 9 पॅकेट गांजा आढळून आला. ज्याची अंदाजे किंमत 3.72 लाख रुपये आहे. चौकशीत, मध्य प्रदेशातील भिंड येथील रहिवासी शाहिद खान हा आरोपी ग्वालियरला पोहोचवण्यासाठी ड्रग्ज पॅकेट घेऊन जात होता. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि पुढील कारवाईसाठी त्याला नागपूरच्या शासकीय रेल्वे पोलिसांकडे (GRP) सोपवण्यात आले आहे.
तर दुसरी कारवाई कलबुरगि आरपीएफ पथकाने दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी जीआरपीच्या समन्वयाने कलबुरगि येथे केली. यात 9.10 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. आरपीएफ आणि जीआरपी पथकांनी गुप्त माहितीनुसार, कलबुरगि स्थानकावर ट्रेन क्रमांक 11020 कोणार्क एक्सप्रेसची तपासणी केली. पथकाला कोच बी-1 मध्ये बर्थ क्रमांक 41 खाली एक बेवारस बॅग आढळली. साक्षीदारांच्या उपस्थितीत योग्य प्रक्रियेनुसार बॅगची तपासणी केली असता त्याच 18.20 किलो वजनाचे 18 बंडल गांजा आढळून आला. जप्त केलेले साहित्य प्रक्रियेनुसार सील करण्यात आले आणि अज्ञात व्यक्तीविरुद्ध वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे ऑपरेशन मध्य रेल्वे आरपीएफ आणि जीआरपीतर्फे राबविण्यात आले.










