Varangaon Crime News: भुसावळ परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या भागात चोरट्यांचा हैदोस सुरूच आहे. अशात भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील बोहर्डी शिवारातील लाल माती भागात चोरीचा प्रकार घडला आहे. या ठिकाणच्या एका गॅस कंपनीच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 57 सिलिंडर्स चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सुमारे 72 हजार 846 रुपयांचा मुद्देमाल चोरीचा गुन्हा वरणगाव पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गॅस गोडाऊनचे संचालक नरेंद्र उत्तमराव अहिरे (वय 51) यांनी वरणगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, 25 व 26 फेब्रुवारी 2026 च्या दरम्यान चोरट्याने गोडाऊनमध्ये प्रवेश करून प्रत्येकी 1 हजार 27 रुपये किमतीचे 57 सिलिंडर्स चोरुन नेले. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी अंदाज व्यक्त केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच संशयितांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, गॅससारख्या ज्वलनशील वस्तूंची चोरी झाल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
72 हजार 846 रुपयांचा मुद्देमाल
या घटनेत चोरट्यांनी 72 हजार 846 रुपये किंमतीचे एकूण 57 सिलिंडर्स चोरुन नेले आहे. गोडाऊनमधून इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर्स चोरीला गेल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. यासीन पिंजारी करीत आहेत.









