Crime News: बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापाऱ्याला सिनेस्टाईल अडवून 8 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या सात संशयित आरोपींना रावेर गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. तर मुख्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश वर्मानी यांनी 6 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्या दुकानातील कर्मचारी गौरव वाघ व तौफिक तेली यांना सावदा, फैजपूर व रावेर येथे मालाच्या वसुलीसाठी पाठवले होते. रात्री सुमारे 9 वाजता खानापूर आरटीओजवळ अज्ञात 8 ते 10 इसमांनी त्यांची गाडी अडवून रोकड भरलेली बॅग हिसकावून नेली होती.
याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्रीची वेळ आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट न दिसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
आरोर्पीकडून 2 मोटारसायक आणि रोख रक्कम जप्त
तरीही पोलिसांनी रावेर, सावदा व फैजपूर येथील एकूण 16 सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान फिर्यादीच्या हालचालींवर दिवसभर लक्ष ठेवून गुन्हा केल्याचा संशय बळावला. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार फारुख शेख रईस, अताउल्लाह खान दाऊद खान, शेख सईद शेख कादर, शेख समीर शेख कलीम, राहील खान दाऊद खान, सोमान खान अय्युब खान व अक्रम खान इस्माईल खान (सर्व रा. बंडू चौक, रावेर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मुख्य आरोपी शेख हसन उर्फ हसन फावड्या (रा. रुस्तम चौक, रावेर) फरार असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी आरोपींकडून 2 मोटारसायकली व 2 लाख 55 हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नरवणे, उपअधीक्षक अनिल बडगुजर व अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
मुख्य आरोपी फरारच
रावेर पोलिसांना बऱ्हाणपूर येथील व्यापाऱ्याची बॅग सिनेस्टाईल अडवून त्यांच्याकडील बॅगमधील 8 लाखांची रोकड लुटणारी टोळी जेरबंद केली असली तरी पोलिसांपुढे केवळ मुख्य आरोपी जेरबंद करणे मोठे आव्हान आहे. मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने तो सापडल्यास अजून या टोळीने जिल्हाभरात कोणते गुन्हे किंवा लूट केली आहे का? याबाबतची उकल होणार आहे. त्यामुळे फरार शेख हसन फावड्याला जेरबंद करणे गरजेचे आहे.









