Dhule News: समग्र शिक्षा मनपा शिक्षण मंडळ, धुळे यांच्या समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी व सुलभ करण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती (टिएलएम) या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन महानगरपालिका हायस्कूल, धुळे येथे करण्यात आले. या कार्यशाळेत शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
सदर कार्यशाळा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या कल्पनेतून व अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रशासन अधिकारी विश्वंभर दासरवाड यांनी समावेशक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन पद्धतीत बदल करण्याचे आवाहन केले.
यावेळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी जितेंद्रसिंग सिसोदिया यांनी विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कमी खर्चातील विविध शैक्षणिक साहित्य तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षकांनी गटांमध्ये प्रत्यक्ष टिएलएम तयार करून सादरीकरण केले.
या कार्यशाळेमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक परिणामकारक होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक गोपाल पवार यांनी परिश्रम घेतले.









