Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निष्काळजापणामुळे हा धक्कादायक प्रकार घडला असून बोरकर लेआऊट येथील अंगणवाडीत चार वर्षीय चिमुकला रात्रभर कोंडला गेल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे शाळा बंद करताना सर्व खोल्यांची व्यवस्थित पाहणी न करता कुलूप लावले. त्यामुळे मुलगा आतच राहिला. सुदैवाने चिमुकला सुरक्षित अवस्थेत आढळून आला.
चार वर्षीय चिमुकला संध्याकाळच्या सुमारास खेळत खेळत अंगणवाडीच्या मागील बाजूच्या खोलीत गेला. खेळता खेळता त्याला तिथेच झोप लागली. दरम्यान, सायंकाळ झाली तरी मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. परिसरात चौकशी, नातेवाईकांकडे संपर्क अशा सर्व शक्यता पडताळूनही त्याचा पत्ता लागला नाही. त्यानंतर, मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने 7 पथके तयार करत शोधमोहीम राबवण्यात आली.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणवाडी उघडण्यात आली असता आत वेगळेच चित्र दिसले. मुलगा अंगणवाडीत सुरक्षित अवस्थेत आढळून आला. रात्रभर तो खोलीतच अडकून होता. सुदैवाने त्याला कोणतीही शारीरिक इजा झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी शाळा व अंगणवाडी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. शाळा बंद करताना प्रत्येक खोलीची काटेकोर तपासणी करणे आवश्यक असून, अशा प्रकारची निष्काळजीपणा पुन्हा होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या.









