नशिराबाद । प्रतिनिधी : नगरपरिषदेची नवनिर्वाचित बॉडी अस्तित्वात आल्यानंतर होणारी पहिली सर्वसाधारण सभा ही अत्यंत महत्त्वाची असते. या सभेत प्रामुख्याने आगामी पाच वर्षांच्या कामांची दिशा ठरवली जाते. मात्र, दि. ३ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या नशिराबाद नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत कोणते विषय चर्चिले गेले, कोणते ठराव मंजूर झाले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जनतेसमोर न आल्याने व पहिल्याच सभेतील ठराव गुप्त ठेवले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
अधिकाऱ्यांची जबाबदारी टाळण्याची भूमिका
विशेषतः या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी पत्रकारांनी नगरपरिषदेतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, स्पष्ट उत्तर देण्याऐवजी जबाबदारी टाळण्याची भूमिका घेतली गेली. मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता, “ही माहिती नगराध्यक्ष वा उपनगराध्यक्षच देऊ शकतील,” असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतरही सभेतील ठरावांबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, सभेतील निर्णय जनतेपासून लपवण्यामागे नेमका उद्देश काय? काही वादग्रस्त वा संवेदनशील विषयांवर चर्चा झाली आहे का, की जे उघड करण्यास नगरपरिषदेची तयारी नाही? ही सभा खरोखरच जनहितासाठी होती की काही निवडक लोकांच्या फायद्यासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नवनिर्वाचित नगरपरिषदेने कारभारात पारदर्शकता ठेवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पहिल्याच सर्वसाधारण सभेनंतर माहिती देण्याबाबत मौन पाळले जात असल्याने, हे आश्वासन प्रत्यक्षात कितपत पाळले जाणार, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणावर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी तात्काळ खुलासा करावा आणि पहिल्या सर्वसाधारण सभेतील सर्व ठरावांची सविस्तर माहिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.)









