Solar Energy: महिन्याला शंभर युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणने मागवलेल्या निविदेत एक किलोवॉट क्षमतेच्या छतावरील सौरउर्जा प्रकल्पाची किंमत सुमारे 45 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.
सध्या सौरऊर्जा पुरवठादार आकारत असलेल्या 60 हजार रुपये या दराच्या तुलनेत नवा दर 15 हजार रुपयाने कमी असल्याने योजनेच्या लाभार्थी पाच लाख छोट्या ग्राहकांची खूप मोठी बचत होणार आहे. आता साठ हजारच्या ऐवजी 45 हजार रुपयात एक किलोवॉटचा छतावरील सौरऊर्जा बसविता येत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आगामी काळात असे प्रकल्प बसविणाऱ्या सर्व गरजू ग्राहकांना लाभ होणार आहे.
राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलार (स्मार्ट) योजनेच्या शासननिर्णयात प्रतिकिलोवॉट 50 हजार रुपये खर्च गृहित धरला आहे. सध्या व्यवहारात सोलर पुरवठादार व्यावसायिक ग्राहकांकडून प्रती किलोवॉट सुमारे 60 हजार रुपये आकारतात. पण महावितरणने मंजूर केलेल्या निविदेत प्रती किलोवॉट 45,450 रुपये इतकी रक्कम स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेत ग्राहकाने भरायच्या हिश्श्याच्या रकमेत आता मोठी कपात होईल.
गरजुंना लाभघेणे झाले सुकर
महावितरणने स्मार्ट योजनेसाठी मागवलेल्या निविदेत एक किलोवॉटच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी 45,450 रुपये इतका कमी दर निश्चित झाल्यामुळे आता अन्य गरजू वीज ग्राहकांनाही लाभ होणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सरकारी अनुदानाशिवाय ऊर्वरित रक्कम ग्राहकाला भरावी लागते. या रकमेत मोठी घट झाल्यामुळे छोट्या गरजू वीज ग्राहकांना योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे होईल.








