जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यातील वातावरणात बदल जाणवू लागला असून थंडीची तीव्रता कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्री व सकाळच्या गारव्यामध्ये घट होत, दुपारच्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता
सध्या जळगावचे किमान तापमान १४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३२ अंशांवर पोहोचले आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून दिवसाचे तापमान ३४ अंशांपर्यंत जाऊ शकते. रात्रीचे तापमान १४ ते १६ अंशांच्या दरम्यान स्थिर राहण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्यात जाणवणारी कडाक्याची थंडी आता ओसरली असून सकाळी व रात्री सौम्य गारवा जाणवत आहे. मात्र दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढत असून उकाड्याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत जळगावकरांना वाढत्या उष्णतेचा अनुभव येण्याची शक्यता आहे.
थंडी कमी झाल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर कमी करून हलक्या कपड्यांकडे कल वाढविला आहे. दरम्यान, तापमानातील वाढीचा परिणाम रब्बी पिकांवर होण्याची शक्यता असल्याने शेतकरी सतर्क झाले आहेत. एकूणच, जळगाव जिल्ह्यात हिवाळ्याची माघार सुरू झाली असून उन्हाळ्याचे आगमन स्पष्टपणे जाणवू लागले आहे.








