Raver Municipal Council News : रावेर येथील नगरपरिषदेत उपनगराध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान दोन राजकीय गटांमध्ये झालेल्या ओढताणीत एका नगरसेवकाचे कपडे फाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या गोंधळानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आसिफ मोहम्मद यांनी उपनगराध्यक्षपदावर कब्जा मिळवला.
रावेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी सोमवारी (दि. १२ जानेवारी) विशेष बैठक घेण्यात आली. याआधीच नगरपालिका परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि भाजप-अजित पवार गटाच्या समर्थकांमध्ये जुंपली.
शरद पवार गटाचे नगरसेवक गणेश सोपान पाटील यांच्या अंगावरील कपडे फाडण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली. यामुळे नगरपालिका परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
भाजपकडून राजेंद्र चौधरी, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आसिफ मोहम्मद रिंगणात होते. काँग्रेसचे दोन आणि शरद पवार गटाच्या एका नगरसेवकाने आसिफ मोहम्मद यांच्या पारड्यात वजन टाकल्याने भाजपच्या हातून सत्ता निसटली.
उपनगराध्यक्ष निवडीच्या धामधुमीत स्वीकृत नगरसेवकांची निवडही पार पडली. यात पद्माकर महाजन, दिलीप हिरामण पाटील आणि राष्ट्रवादीकडून विनीत सूर्यकांत अग्रवाल यांची वर्णी लागली.









