तळोदा : घराची भिंत कोसळून दोन जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना तळोद्यातील मराठा चौक परिसरात मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. यात एकाची प्रकृती चिंताजनक असून, दोघांवर सुरत येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तळोदा शहरातील मराठा चौक येथे गाढे कुटुंब वास्तव्याला आहेत. दरम्यान, मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास सर्व सदस्य घरात गाढ झोपेत असताना अचानक भिंत कोसळली. यावेळी रमेश फकीरा गाढे आणि त्यांची सून विद्या नरेश गाढे हे भिंतीखाली दबले गेले.
दोघांनाही जबर मार लागला, तर रमेश फकीरा गाढे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तातडीने त्यांना सुरत येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच अनुप उदासी, भैय्या चौधरी, योगेश चौधरी, अकबर पिंजारी, योगेश मराठे, गोलू दातार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.











