DSP Mohammed Siraj : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या कामगिरीची दखल घेत तेलंगणा सरकारने त्याला पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) हे प्रतिष्ठित पद दिले आहे. मात्र, अनेकांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे डीएसपी सिराजला किती पगार मिळतो. जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर त्याला त्याचा फायदा होईल का? या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती जाणून घेउयात.
डीएसपीचा पगार किती ?
तेलंगणा पोलिसात डीएसपी म्हणून नियुक्त अधिकाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो. सध्या, या पदासाठी मासिक पगार ₹५८,८५० ते ₹१३७,०५० पर्यंत आहे. हा पगार अधिकाऱ्याच्या ज्येष्ठतेवर आणि सेवेवर अवलंबून असतो.
याशिवाय, विविध भत्तेदेखील मिळतात. यामध्ये घरभाडे, वैद्यकीय, प्रवास भत्ता आणि इतर सरकारी फायदे समाविष्ट आहेत. हे भत्ते जोडल्याने एकूण उत्पन्नात आणखी वाढ होते.
८ व्या वेतन आयोगाबद्दल चर्चा
८ व्या वेतन आयोगाबद्दल देशभरात चर्चा सुरु आहे. अंमलबजावणीबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, भविष्यात निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे.
८ वा वेतन आयोग लागू झाल्यास, वेतन निर्धारण नियम पुन्हा बदलले जाऊ शकतात. असे मानले जाते की नवीन फिटमेंट फॅक्टर सध्याच्या पातळीपेक्षा जास्त असू शकतो. यामुळे सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार वाढतील.
पगार किती वाढू शकतो?
जर आठवा वेतन आयोग लागू झाला आणि फिटमेंट फॅक्टर वाढवला गेला तर डीएसपी सारख्या अधिकाऱ्यांच्या पगारातही लक्षणीय वाढ होऊ शकते. अंदाजानुसार, डीएसपीचा किमान पगार ₹८०,००० पेक्षा जास्त असू शकतो, तर कमाल पगार ₹१.८० लाख ते ₹१.८५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो.








