जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात
Jalgaon News: जागतिक महिला दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून महिलांच्या कर्तृत्वाचा, संघर्षाचा आणि समाजातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्याम शिंदे यांनी केले. 8 मार्च 2026 रोजी जळगाव जिल्हा समस्त न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्यावतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंजू व्यास होत्या.
महिला दिनाच्या निमित्ताने जळगाव जिल्हा न्यायालयातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. संघटनेच्या व सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्यावतीने महिलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
पुढे बोलताना श्री. शिंदे म्हणाले, घरापासून ते देशाच्या प्रगतीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. आजची स्त्री आत्मविश्वासाने व धैर्याने प्रत्येक आव्हानाला सामोरी जात असून कुटुंबाबरोबरच समाज आणि देशाच्या विकासातही मोठे योगदान देत आहे. यावेळी त्यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
यावेळी महिलांचे समाजातील तसेच न्यायालयीन कामकाजातील महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करण्यात आले. महिला दिनानिमित्त महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती शुक्ला मॅडम, श्रीमती पुराणिक मॅडम, श्रीमती अश्विनी भट मॅडम, श्रीमती गंगा वासेवाय मॅडम व श्रीमती शोभा गायकवाड मॅडम, जळगाव जिल्हा लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष योगेश सोनवणे, प्रकाश सपकाळ, बेलीफ संघटनेचे अध्यक्ष सुजित चंदनकर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधी शितल माळी, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश सोनार, सरचिटणीस रवी अहिरराव, कोषाध्यक्ष दिनेश वाघ, सह-कोषाध्यक्ष अतुल भालेराव, सह-सचिव हर्षल शिरसागर तसेच संघटनेचे पदाधिकारी व न्यायालयीन महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परवीन पटेल यांनी केले, तर आभार प्रदर्शन गंगा वासेवाय यांनी केले.










