Nashik News: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोड येथे सार्वजनिक जयंती समितीने उभारलेल्या महाबोधी महाविहाराच्या प्रतिकृतीचे लोकार्पण पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते झाले. प्रारंभी आंबेडकर व फुले यांच्या प्रतिमांचे पूजन होऊन त्रिशरण पंचशील घेण्यात आले. जयंती निमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव, भारत निकम, समीर शेख, अमोल पगारे, जयंती अध्यक्ष आकाश भालेराव व कार्याध्यक्ष गौरव काळे यांनी दिली.
मुंबई येथील कला दिग्दर्शक सुनील समजीसकर यांनी साकारलेली महाबोधी महाविहाराची ही भव्य प्रतिकृती ३२ बाय ३२ फूट आकाराची असून, जमिनीपासून ५० फूट उंची हे तिचे वैशिष्ट्य आहे. आंबेडकर पुतळ्याच्या भोवती साकारलेली ही प्रतिकृती नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येला १३ एप्रिलला मध्यरात्री बाराला जयंती समितीचे अध्यक्ष आकाश भालेराव यांच्या हस्ते पुतळा पूजनाने कार्यक्रमांना सुरूवात होईल.
१४ एप्रिलला सायंकाळी मुख्य मिरवणुकीला प्रारंभ होईल. फटाक्यांची भव्य आतषबाजी आणि १०१ तोफांची सलामी देऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येईल. १५ एप्रिलला सायंकाळी सातला प्रा. अविनाश नाईक यांचा ‘यशोगाथा महासूर्याची’ हा प्रबोधनपर कार्यक्रम, १६ एप्रिलला युवा रॉकस्टार संतोष जोंधळे याचा गायन कार्यक्रम, १७ एप्रिलला प्रख्यात लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा ‘नृत्य बहार’ कार्यक्रम, तर १८ एप्रिलला महागायक मिलिंद शिंदे यांचा भगवान गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या गीतांचा कार्यक्रम होईल. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे उपाध्यक्ष प्रशांत पगारे, सुचित्रा गांगुर्डे, सरचिटणीस शुभम पगारे, सहचिटणीस शिरीष कांबळे, कैलास वानखेडे, अशोक खैरनार आदी प्रयत्न करत आहेत.








