LPG Shortage Jalgaon News: गॅस सिलेंडर पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. घरगुती गॅससह आता व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने मेस चालकांना त्याचा फटका बसला असून मेस बंद करण्याची वेळ आली. मात्र मेसवर अवलंबून असलेल्या शहर परिसरातील विद्यार्थ्यांची उपासमार झाली आहे. शासनाने प्राधान्य क्रम ठरवला असला तरी नागरिकांची गॅस मिळविण्यासाठी वणवण सुरूच असल्याचे चित्र आहे.
शासनाने गॅस टंचाई दूर करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. जिल्हा स्तरावर पथके स्थापन केली, गॅस वितरणाचा प्राधान्यक्रम ठरवला, पण नागरिकांच्या अडचणी दूर होतांना दिसत नाही. गॅस सिलिंडर मिळत नसल्याने आता शहरातील हॉस्टेल, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जेवणाचे डब्बे देणारे मेस चालक अडचणीत आहे. वेळेवर एलपीजी गॅस मिळत नसल्याने जेवणाचे डब्बे पुरवणे अवघड झाले. त्यामुळे मेस बंद करण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे अनेक मेस चालकांनी सांगितले. उदर्निवाहाच्या साधनावर गदा आल्याने मेस चालक हैराण झाले आहे.
जिल्हा व शहर परिसरात मोठ्या प्रमाणात शाळा कॉलेजचे विद्यार्थी राहतात. त्यातच सिलेंडरचा काळाबाजार सुरू आहे. ते सिलेंडर घेणे ही परवडत नसल्याचे मेस चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. तसेच नवीन नवीन ग्राहकाचा डब्बा स्वीकारणे बंद केले आहे. त्यामुळे पुरवठा सुरळीत कशी होणार असा सवाल आता नागरिक, विद्यार्थी उपस्थित करत आहेत. शासनाने प्राधान्य क्रमानुसार रुग्णालये, शैक्षणिक संस्था, स्मशानभूमी, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांना १०० टक्के पुरवठा दिला जाय आहे असे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्र्यांनी सांगितले आहे. पण पुरवठा साखळी खंडित झाल्याने या विद्यार्थी नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
केंद्र सरकारने ७ मार्च २०२६ पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली असून ती ८९२.५० रुपयांवरून ९१२.५० रुपये करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलिंडरची किंमतही १७२०.५० रुपयांवरून १८३५ रुपये करण्यात आली आहे. सरकारी दर एकीकडे आणि काळ्याबाजारात आणखी जास्त दर आकारला जात आहे.






