Varangaon News: “कर भरतोय आम्ही, मग सुविधा कोणासाठी?” असा जळजळीत सवाल करत वरणगावच्या संतप्त विद्यार्थी व सजग करदात्या नागरिकांनी आज नगरपरिषद प्रशासनाला धारेवर धरले. शहराच्या मध्यवर्ती भागात धूळ खात पडलेली नगरपरिषदेची जुनी इमारत ही केवळ वास्तू नसून ते वरणगावच्या विद्यार्थ्यांचे ‘उद्याचे भविष्य’ आहे. त्याठिकाणी तत्काळ हायस्पीड वाय-फाय युक्त आधुनिक अभ्यासिका सुरू करावी, या मागणीसाठी नगराध्यक्ष सुनील काळे यांना निवेदन देण्यात आले.
प्रशासकीय ‘लकवा’ की जाणीवपूर्वक दुर्लक्ष?असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. एकीकडे
देशात ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘नवीन शैक्षणिक धोरणा’च्या (NEP-2020) गवगवा सुरू असतांना वरणगाव नगरपरिषदेत अद्याप ‘शिक्षण समिती’ गठीत का झाली नाही? ‘शिक्षण सभापती’ पद रिक्त का आहे? असे गंभीर प्रश्न या निवेदनातून उपस्थित करण्यात आले आहेत.
शहराच्या सुशोभीकरणावर लाखो रुपये खर्च करणाऱ्या प्रशासनाला गरीब विद्यार्थ्यांच्या पायपीटीची जाणीव का नाही, असा रोखठोक सवालही यावेळी करण्यात आला. आता नाही तर कधीच नाही!’ विद्यार्थ्यांनी केवळ मागणीच केली नाही, तर प्रशासनाला ठोस मुदतही दिली आहे. नगरपरिषदेच्या आगामी बैठकीत विरोधी पक्षनेते, सभागृहनेते आणि सर्व नगरसेवकांनी गट-तट आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा द्यावा. ही आधुनिक अभ्यासिका येणाऱ्या ११ एप्रिल (महात्मा फुले जयंती) किंवा १४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती) या क्रांतीदिनांचे औचित्य साधून कार्यान्वित व्हावी, अशी आक्रमक मागणी करण्यात आली आहे. यावेळी महेश सपकाळे, गौरव सोनार, तुषार भोई, सागर महाजन, शिवाजी धनगर, केदार माळी,शैलेंद्र माळी उपस्थित होते.
या आहेत प्रमुख मागण्या
-मध्यवर्ती ठिकाणी ‘ज्ञानमंदिर’ या जुन्या इमारतीचे रूपांतर सुसज्ज अभ्यासिकेत करून रिकाम्या वास्तूचा सदुपयोग करावा.
-डिजिटल सुविधा: हाय-स्पीड मोफत Wi-Fi, सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्पर्धा परीक्षांच्या संदर्भ ग्रंथांची उपलब्धता अनिवार्य असावी.
-गरीब विद्यार्थ्यांची पायपीट थांबवावी. शहराबाहेरील अभ्यासिकेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांकडे स्वतःची वाहने नाहीत, त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणीच जागा मिळावी.






