Central Railway : मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाश्यांवर कारवाई सुरू केली आहे. विशेष तिकीट तपासणी मोहिमेद्वारे रेल्वेने एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान 37 लाख 99 हजार विनातिकीट व अवैध प्रवास करणारे प्रवासी पकडले. यात मागील वर्षीच्या तुलनेत 3 लाख फुकट्या प्रवाशांची भर पडली आहे. कारवाईतून 11 महिन्यात 227 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत 34 लाख 60 हजार फुकटे प्रवासी पकडण्यात आले होते. यंदा या संख्येत जवळपास 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कारवाईदरम्यान एकूण 227 कोटींचा विक्रमी दंड वसूल करण्यात आला. गतवर्षी याच काळात 185.62 कोटींचा दंड वसूल झाला होता, म्हणजेच
यंदा 22 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली आहे. केवळ फेब्रुवारी 2026 महिन्यातच तिकीट तपासणी पथकांनी 3.65 लाख विनातिकीट प्रवासी पकडले. फेब्रुवारी 2025 मध्ये ही संख्या 3.32 लाख होती. फेब्रुवारी 2026 मध्ये नियमभंग करणाऱ्या प्रवाशांकडून 23.27 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला असून, ही रक्कम गतवर्षाच्या तुलनेत सुमारे 30 टक्क्यांनी अधिक आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना तिकीट काढूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच मोबाईलवर ‘रेल वन’ अॅप डाउनलोड करून त्याद्वारे तिकिटे बुक करण्याचाही सल्ला दिला आहे. दरम्यान, बनावट तिकीट तयार करणे किंवा मिळवणे हा गुन्हा असून, यासाठी दंडासह कमाल 7 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कारवाई नियमीतपणे सुरू राहणार
अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे स्टेशन तपासणी, अँबुश तपासणी, फोर्ट्रेस तपासणी तसेच मेगा तिकीट तपासणी अशा विविध मोहिमा राबविल्या जात आहे. मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्यांसह मुंबई आणि पुणे विभागातील उपनगरी गाड्यांमध्येही नियमितपणे ही कारवाई केली जात आहे.
विभागनिहाय असा वसूल झाला दंड
-मुंबई विभागात 16.16 लाख प्रकरणांमध्ये 71.32 कोटी रुपये.
-भुसावळ विभागात 8.94 लाख प्रकरणांमध्ये 75.29 कोटी रुपये.
-पुणे विभागात 4.31 लाख प्रकरणांमध्ये 27.14 कोटी रुपये.
-नागपूर विभागात 4 लाख प्रकरणांमध्ये 24.93 कोटी रुपये.
-सोलापूर विभागात 2.30 लाख प्रकरणांमध्ये 10.53 कोटी रुपये.
-मुख्यालयाने 2.28 लाख प्रकरणांमध्ये 17.82 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.











