Dhule News: आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावाचे पडसाद आता जागतिक स्तरावर उमटू लागले असून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर सातत्याने वाढत असल्याने भविष्यात इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील तीन गावांनी घेतलेला निर्णय सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.
बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या तीन गावांनी एकत्र येत पुढील सहा महिन्यांसाठी एलपीजी गॅसचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातून इंधन बचतीचा एक वेगळा आणि सकारात्मक संदेश दिला जात आहे. या संदर्भात आयोजित विशेष बैठकीत तिन्ही गावांतील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वानुमते ठराव मंजूर करताना देशहित सर्वोच्च ही भूमिका स्पष्टपणे मांडण्यात आली. शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे पर्यायी इंधनस्रोत उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ग्रामीण भागातील या गावांनी स्वतःहून त्याग करण्याचा निर्णय घेतल्याचे बैठकीत सांगण्यात आले. गावकऱ्यांकडे पारंपरिक चुली, लाकूडकाटा, गोवऱ्या यांसारखे पर्याय उपलब्ध असल्याने त्यांनी या साधनांचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या बैठकीला बारीपाडाचे सरपंच अनिल पवार, मोहगावचे सरपंच लक्ष्मण महाले, चावडीपाडाचे सरपंच रमण बहिरम, मोहगावचे उपसरपंच सुरेश चौरे तसेच चावडीपाडाच्या उपसरपंच हीनाबाई सोनवणे यांची उपस्थिती होती. तालुका समन्वय समितीचे सदस्य उमेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय पद्मश्री चैत्राम पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्णय अधिक बळकट झाला. ग्रामस्थांमध्ये साहेबराव पवार, विमलताई पवार, शेवंताबाई पवार, संगीताताई पवार, सोमनाथ गांगुर्डे, रमेश गावित, बाबुराव अहिरे, सापटू अहिरे, देविदास पवार, कैलास पवार यांसह अनेकांनी सक्रिय सहभाग घेतला. वनवासी विकास प्रतिष्ठानचे पराग पंचभाई आणि पृथ्वी मोलाची फाऊंडेशनच्या केतकी कुहेकर यांची उपस्थितीही उल्लेखनीय ठरली. या निर्णयाची अंमलबजावणी करताना महिलांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तसेच आवश्यक त्या ठिकाणी सामूहिक स्वयंपाक केंद्रे उभारण्याचा प्रस्तावही चर्चेत आला. या निर्णयाचे गावकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले असून ‘देशासाठी थोडा त्याग करण्याची हीच वेळ आहे,’ अशी भावना व्यक्त केली. काहींनी हा उपक्रम सहा महिन्यांनंतरही सुरू ठेवण्याची तयारी दर्शवली.






