Jalgaon News: शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकासह त्यांच्या समर्थकांना पोलिसांसमोरच दुसर्या गटाने बेदम मारहाण केली. या राड्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारातच कुस्तीचा आखाडा भरला होता. माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि राहुल ठाकरे उर्फ मोगली बाबा यांच्यात महानगरपालिकेच्या निवडणुका आणि ठेक्यांच्या वादातून मारहाण झाल्याची चर्चा आहे. यामध्ये तीन जण जखमी झालेले असून काही शस्त्र ही जप्त करण्यात आलेली आहे.
जळगाव शहरातील वाल्मिक नगरात भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांचा आणि तरुणांच्या एका गटात किरकोळ वाद झाला होता. या वादाची तक्रार देण्यासाठी दोन्ही गट शनिपेठ पोलीस ठाण्यात पोहोचले होते. पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर आणि इतर कर्मचारी तक्रार नोंदवून घेत असतानाच, राहुल ठाकरे उर्फ मोगली बाबा हा आपल्या साथीदारांसह पोलीस ठाण्यात घुसला. त्यांनी काहीही विचार न करता थेट कैलास सोनवणे आणि त्यांच्या दोन साथीदारांवर हल्ला चढवला. दरम्यान या वादाला राजकीय आणि व्यावसायिक संघर्षाची मोठी किनार आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या निवडणुकीत माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांची मुलगी आणि राहुल ठाकरे उर्फ मोगली बाबा याची पत्नी एकमेकींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होत्या. तेव्हापासून या दोन गटांत तीव्र राजकीय वैमनस्य आहे. त्यातच महानगरपालिकेच्या ठेक्यावरूनही त्यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस ठाणे आणि वाल्मिक नगर परिसरात राज्य राखीव पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिपेठ पोलीस ठाण्यात लोकप्रतिनिधीवर झालेला हा हल्ला जळगावात गुन्हेगारी वाढल्याचे द्योतक आहे.
पोलिसांसमोर फ्री-स्टाईल हाणामारी
पोलीस ठाण्याच्या परिसरातच दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने प्रचंड गोंधळ उडाला. सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस ठाण्यात फ्री-स्टाईल हाणामारी झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर करत दोन्ही गटातील कार्यकत्यार्र्ंना पांगवले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव कैलास सोनवणे यांना तात्काळ पोलीस वाहनातून सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.






