World Consumer Right Day 2026: ग्राहक चळवळीला ताकत मिळावी म्हणून दरवर्षी १५ मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून पाळला जातो, त्याचे मूळ उद्दिष्ट ग्राहकांना त्याच्या हक्कांबद्दल आणि गरजांबद्दल जागरूक बनवणे आहे. या दिवसाचे महत्त्व हे सर्व ग्राहकांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्याची मागणी देखील मानली जाते. त्याच्या हक्कांना कमकुवत करणाऱ्या बाजारपेठेतील संस्थांकडून होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न आहे. फसवणूक करणाऱ्या समाजातील अपप्रवृत्तींचा, अन्यायाचा निषेध करण्याची संधी ही आहे. त्यातूनच ग्राहकांच्या न्याय हक्काच्या लढ्याला बळ देण्यात आले.
ग्राहक चळवळीला अधिक मजबूत करण्यासाठी जागतिक ग्राहक हक्क दिनाला आंतरराष्ट्रीय संघटनांनी बळ दिले. त्यात संयुक्त राष्ट्रे आणि इतर आंतरराष्ट्रीय घटकांच्या पाठिंब्याने जागतिक स्तरावर मान्यता मिळालीे. कंझ्युमर्स इंटरनॅशनल सारख्या संघटनांनी ४० वर्षांहून अधिक काळ ही मोहीम चालवली आहे, त्यातून ग्राहक चळवळ अधिक मजबूत केली. ग्राहकांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागतिक कृती एकत्रित केली आणि चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी कंझ्युमर्स इंटरनॅशनलचे सदस्य दरवर्षी मोहिमा ही राबत आहे. ग्राहक हक्कांचे विषय निवडून ते राबवत आहे. अशा मोहिमांना आंतरराष्ट्रीय मानक संघटना, जागतिक ऊर्जा परिषद, मोजिला फाउंडेशन, महासागर संवर्धन, आर्थिक विकास आणि सहकार्य संघटना, युरोपियन कमिशन आणि इतर अनेक संस्थांनी मान्यता दिली आहे.
बऱ्याचदा ग्राहक हा आपल्या आपल्या हक्काबाबत गाफील असतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो याचाच फायदा बाजारातील व्यावसायिक संस्था उचलत असतात. ते ग्राहकाला गृहीत धरून मनमानी करतांना दिसतात ग्राहक हा बाजारपेठेतील सर्वात महत्वाचा घटक आहे. परंतु ग्राहकांना खरेदीसाठी उद्युक्त करण्यासाठी विक्रेत्यांकडून अनेक प्रयत्न केले जातात. वेगवेगळी आमिषे दाखवली जातात, यातून अनेकदा फसवणुकीचे प्रकार देखील घडतात. यामुळे जगभरातील बाजारापेठेतील अन्यायाविषयी ग्राहकांना जागरुक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
वाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा आहे. देशातील कायदेविषयक वैधानिक संस्थांकडून ग्राहकांना न्याय मागता येतो, याची जाणीव करुन दिली जाते. या कायद्यानुसार आता कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो. त्याला अधिकार आहे हे त्याला समजून सांगण्यात येते. पूर्वीच्या काळात व्यावसायिकांच्या व्यवहारात होणारी फसवणुक लक्षात घेऊनच हा कायदा बनवला गेला. ग्राहक हक्कांची चळवळ समर्थपणे चालवणाऱ्या संस्थानी १९८३ मध्ये जागतिक ग्राहक दिन पहिल्यांदा साजरा करण्यास प्रारंभ केल्याचे स्पष्ट होते. भारतामध्ये ही ग्राहक चळवळ मजबूत करण्यासाठी १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला ग्राहक संरक्षणासाठी पाऊल टाकण्यात आले.
अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये १५ मार्च १९६२ साली तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकारांवर भाषण करुन ग्राहकांना जागरूक केल्याचे सांगण्यात येते ग्राहक हक्कांबद्दल वक्तव्य करणारे केनेडी हे पहिले नेते असल्याचे बोलले जाते. त्याच्या अशा भूमिकांमुळे ते सामान्य लोकांचे प्रतिनिधी असल्याची छवी तयार झाली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांच्या हक्कांबाबत मोठी जनजागृती झाली आणि ग्राहकांना त्याची जाणीव झाली.





