Kalyan-Ahilyanagar Highway Accident News : कल्याण – अहल्यानगर महामार्ग आज भीषण आपघाताने हादरला. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघातात एक ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या धडकेनंतर ईको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.या अपघातात आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीची प्रकृती चिंताजनक आहे.
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरती एका पुलावरती हा भीषण अपघात झाला. कल्याण ते मुरबाड अशी प्रवासी वाहतूक करणारी ही ईको कार होती. ईको कारने सिमेंट मिक्सरला जोरदार धडक दिल्याने या कारमधील ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यातील १ प्रवासी बचावला आहे, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. अपघाताचा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना आणि जखमीला बाहेर काढले.
दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील दुतर्फा वाहतूक विस्कळीत होत दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी समयसुचकता दाखवत माहमार्गावरील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघात प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे आणि मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरु होते. या अपघातातील एकमेव गंभीर जखमी व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.










