Gold and Silver Rate: संपूर्ण जगाला वेठीला धरणारं आणि एका मोठ्या विध्वंसाच्या दिशेने वाटचाल करणार इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर तात्पुरते थांबले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन आठवड्यांसाठी इराणवर हल्ले करणार नाही, असे सांगत शस्त्रसंधीची घोषणा केली. दरम्यान, इराणकडून आलेला 10 कलमी तहाच्या प्रस्तावाबाबत ट्रम्प यांनी सकारात्मक संकेत दिले. शस्त्रसंधीची घोषणा झाल्याने शेअर मार्केटने सुटकेचा निश्वास सोटला आहे. भारतीय शेअर बाजारात तर आज मोठी उसळी पाहायला मिळत आहे. याशिवाय, सोने आणि चांदीच्या दरातही मोठी वाढ होताना दिसत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री इराणची संपूर्ण लोकसंस्कृती नष्ट होईल, असा हल्ला करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे अमेरिका-इस्रायल मंगळवारी रात्री इराणवर मोठ्या स्वरुपाचा हल्ला करतील, अशी शक्यता वाटत होती. इराणवर अणुबॉम्बचा प्रयोग होऊ शकतो, या शक्यतेने जग धास्तावले होते. तसे झाले असते तर जगभरातील भांडवली बाजारात मोठी पडझड झाली होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा केल्याने संपूर्ण जगाचा जीव भांड्यात पडला.
इराण-अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर बुधवारी सकाळी वायदे बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदल पाहायला मिळाले. याशिवाय, स्थानिक बाजारपेठांमध्येही सोने आणि चांदीचा भाव वाढला आहे. बुधवारी सोने 1 लाख 51 हजार 500 रुपयांवर पोहोचला. तर चांदीचा 2 लाख 47 हजारांवर जाऊन पोहोचला आहे. इराण-अमेरिका युद्ध आता समाप्तीच्या दिशेने वाटचाल करु लागल्याने आगामी काळात सोन्याच्या भावात आणखी उसळी पाहायला मिळू शकते, असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांकडून वर्तवला जात आहे.
शेअर बाजारात मोठी उसळी
बुधवारी सकाळी भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. प्री-ओपनिंग सत्रातच सेन्सेक्सने तब्बल 2700 हून अधिक अंकांची ऐतिहासिक झेप घेतल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर निफ्टी 750 अंकांनी वधारला आहे. आयटी, मेटल, रिअॅल्टी क्षेत्रातील समभागात मोठी तेजी दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या भावात देखील मोठी घसरण झाली आहे, 13 टक्क्यांनी दर पडले आहेत. कच्च्या तेलाचे भाव 95 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. अदानी पोर्ट, इंडिगोच्या समभागात मोठी उसळी पहायला मिळत आहे.







