Jalgaon News: प्रवाश्यांना जास्तीत जास्त चांगल्या सेवा देण्यासाठी मध्य रेल्वेनं कंबर कसली आहे. मध्य रेल्वेच्या जळगाव स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. रेल्वेने आणखी सोयीसुविधा वाढवण्यासाठी दोन फलाटांवर सरकते जिने (एस्कलेटर) आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था करण्यासोबत अतिरिक्त तिकीट खिडकी उभारंणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
जळगाव स्थानकावर प्रवाशांना सध्या भेडसावणाऱ्या विविध मूलभूत सुविधा, सुरक्षितता व मॅनेजमेंट संबंधित प्रश्नांकडे लक्ष वेधले, याबाबत तातडीने तोडगा काढावा अशी मागणी मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य विराज कावडीया यांनी भुसावळ विभागाकडे केले आहे. याबाबत वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक अजयकुमार यांच्याकडे विविध मागण्या कावडीया यांनी केल्या. जळगाव स्थानकातील समस्या, प्रवाशांच्या अडचणी व सुविधा यांबाबतही त्यांनी विस्तुत चर्चा केली. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात वाढलेले अतिक्रमण या विषयाकडेही कावडीया यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे, त्यामुळे प्रवाश्यांना मार्ग काढत स्थानक गाठावे लागते या ठिकाणी अनधिकृतपणे उभारण्यात आलेले स्टॉल, हातगाड्या व इतर व्यवसायांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होत होते, त्यामुळे प्रवाशांना ये-जा करणे अडचणीचे ठरते. तसेच यहा ठिकाणी वाहतूक कोंडी होते. रेल्वेने या बाबत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. याबाबत रेल्वे मंडळाच्या बांधकाम विभागामार्फत पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावर पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याची गरजही अधोरेखित करुन फलाट क्रमांक 2 आणि 6 वर सरकते जिनेची मागणी करण्यात आहे, पाटलीपुत्र एक्सप्रेसला जळगाव येथे अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या मार्गावरील प्रवाशांची संख्या लक्षात घेता हा थांबा आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच जळगाव रेल्वे स्थानकावर स्वतंत्र चार चाकी वाहनतळ विकसित करण्याची मागणी करण्यात आली. जळगाव रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. त्यादृष्टीने प्रवाशांना सोयीसुविधा पुरवण्यात यावा अशी मागणी ही कावडीया यांनी केली.







