होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Bhmergaon Festival: यात्रोत्सवाची ५० वर्षांची परंपरा अन् ऐतिहासिक किल्ल्याचे ‘भामेर’गाव

On: April 9, 2026 3:29 PM
Follow Us:
---Advertisement---

Dhule News: साक्री येथील भामेर गाव म्हटलं की, त्याचा इतिहास आणि इतिहासाची भुज राखणारं ते गाव. साक्री तालुक्यातील उत्तरेला माळरानावर वसलेलं भामेर हे गाव ऐतिहासिक किल्ल्याचे गाव. येथे भवानी मातेचा यात्रोत्सव गेल्या ५५ वर्षापासून साजरा केला जातो, यंदा ही तो मोठया उत्साहात आणि धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला. या गावाची लोकसंख्या सुमारे चार हजार आहे. भारतातील लोकसंस्कृती ही मातृसत्ताक संस्कृती आहे. म्हणून आज महाराष्ट्रात नव्हे प्रत्येक ठिकाणी आपल्या मातृसत्तेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कुलदैवतांचं स्मरण करून यात्रोत्सव साजरा करण्यात आला.

भामेर या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे ‘एक गाव- एक संस्कृती- एक विचार ‘असे आहे. या गावात ‘गाव तिथे भानगडी’ हे स्वरूप नसून ‘गाव तिथे शांती’ असे स्वरूप आहे. अगदीच मतभेद झाले तर मनभेद न होता, एकोपा साधला जातो.असं हे एक भामेर गाव. या गावाचे सामाजिक चार स्तंभ आहेत माळी, बौद्ध , भिल्ल, धनगर! या चार समाजाचा एकोपा आणि मानवतेच्या विचारांवर या गावाची जडणघडण घडली आहे. या गावातील सुशिक्षित तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत भावकीचे नाते आहे. त्यामुळे घरात जसे ‘कपातलं वादळ उठतं अन् क्षणात शमते’ तसाच समज ,गैरसमज मिटविले जातात. हे गाव ‘मातृसत्ताक’ गाव असल्याने इथे ‘भवानी मातेचा यात्रोत्सव गेल्या ५५ वर्षापासून सुरू आहे. या यात्रोत्सवामध्ये आबाल वृद्ध मोठा भक्ती भावाने आणि आनंदाने सहभागी होतात.

यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘मानाचा तगत्राव’ संपूर्ण गावातून फिरवण्यात आला. येणा-या सर्व भाविकांसाठी महाप्रसाद व भोजन व्यवस्था होती. यात्रोत्सवात खेळणी, दुकाने, पाळणे व हॉटेल थाटली. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी “कुस्त्यांची दंगल” भरविलीे. खान्देशात धुळे, नंदुरबार ,जळगाव, बागलाण येथील नामांकित पहिलवान कुस्त्या खेळण्यासाठी आले.

यात्रा उत्सवाची प्रमुख धुरा गावातील यात्रा उत्सव समिती प्रमुख तथा महात्मा ज्योतिराव फुले विद्या प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सुभाष सोनवणे सर यांसह समिती पदाधिकारी, यात्रा उत्सव कमिटीत धनराज पाटील, लोटन सोनवणे, नाना सोनवणे, रामा सोनवणे, भगवान भामरे (माजी पोलीस पाटील) आदीं सहभागी झाले होते. पोलीस प्रशासनाच्या सहकार्यामुळे यात्रा उत्सव आनंदात पार पडला. बाहेरगावी गेलेले लोकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गावाच्या उत्कर्षासाठी काय करता येईल का याबाबत विचारविनिमय केला. यात्रोत्सवाचे दोन दिवस बघता बघता कसे गेले ते कळत नाही, कामाच्या ओढीने पावले पुन्हा माघारी फिरली ती पुन्हा गावात पुन्हा परत येण्यासाठी.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment