Nashik Kunbhamela: कुंभमेळ्याच्या अनुषंगाने साधू महंतांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे सांगून सिंहस्थ कुंभमेळ्याची ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असून राज्याचे मुख्य सचिव यांच्या पाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशकात होते. २०२६-२७ या काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय संत समितीच्या वतीने नाशिकच्या पंचवटीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते. या दोन दिवसीय परिषदेत देशभरातील प्रमुख साधू, महंत उपस्थित आहेत. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात प्रथमच कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण सरकारने स्थापन केले.तसेच कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. कुंभमेळयाच्या तयारीत काही कसर राहिली तर आम्हाला जबाबदार धरा. शासनाकडून कोणकोणती कामे सुरू आहे याची माहिती ही त्यांनी दिली. कधी कधी कुंभमेळा संपल्यानंतर अमूक एक राहून गेल्याचे लक्षात येते. त्यामुळे प्रत्येक कुंभमेळा काही ना काही शिकवून जातो. मागील कुंभमेळ्यात राहून गेलेली गोष्ट पुढील कुंभमेळ्यात केल्या जातात. कुंभमेळा आयोजनाचा उत्साह असला तरी चिंताही असल्याचे फडणवीस यांनी नमूद करत महंतांकडून सरकारला कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, अशी विनंती ही केली.
नशामुक्त कुंभाचा संकल्प
दरम्यान अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेत पहिल्या दिवशी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात “नशामुक्त कुंभ” ही संकल्पना राबविण्याचा निर्धार साधू, महंतांनी केला होता. कुंभमेळा हा देशभरासाठी आदर्श ठरावा आणि युवाशक्तीला योग्य दिशा मिळावी, यासाठी हा संकल्प करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा सादर केला. स्वच्छता पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, सुरक्षा आणि वाहतूक आदी मूलभूत सोयीसुविधांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी साधू, महंतांनी काही सूचना केल्या. त्याप्रशासनातर्फे सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले.






