Mumbai News: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी एसआयटीने चौकशीला गती दिली आहे. मागील आठवड्यात खरात प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या, खरातला भेटलेल्या राजकीय आणि हाय प्रोफाईल लोकांचे फोटो व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाले होते, त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. या प्रकरणी विरोधांनी कारवाईची मागणी करून राज्य सरकारवर टीकेची झोड उडविले होती. त्यामुळे सरकारने पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी नेमली होती. एसआयटीने पुरावे हातात घेत खरातचे पाळेमुळे शोधण्यास सुरुवात केली असून खरातकडून पोलिसांनी ५६ व्हिडिओ ताब्यात घेतले आहे. याप्रकरणातील पिढीत महिला हळूहळू पुढे येऊन खरातची पोलखोल करत आहे. त्यामुळे लिंगपिसाट खरातचा पाय आणखी खोलात रुतला आहे. खरात अनेक राजकीय आणि हाय प्रोफाईल लोकांच्या संपर्कात होता, त्यामुळे त्यांचीही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली. याप्रकरणातील राजकारण्यांची चौकशी केली जाणार असल्याचे निवेदन त्यांनी सभागृहात केले असून त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
अशोक खरात प्रकरणी आमदार भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित करून खरातशी संबंध असणाऱ्या राजकारण्यांची चौकशी होणार का? असा प्रश्न विचारला.होता.याप्रकरणी निवेदन करतांना मुख्यमंत्री म्हणाले, राजकारणी,अधिकारी किंवा आर्थिकदृष्ट्या मदत करणाऱ्यांचीही चौकशी होणार आहे.भास्कर जाधव यांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्या व्यक्तीविरोधात पुरावे मिळतील, त्या सर्वांची चौकशी करू, आपण सर्व राजकारणात आहोत. कुणाचा फोटो कुणासोबत येतो हे बघितले आहे. फक्त कुणाचा फोटो कुणासोबत आहे म्हणून कुणालाही आरोपी करता येत नाही. पण खरातच्या मोबाईलमधील डीलिटेड केलेला डेटा ही काढला जात आहे. खरातशी कुणाचा संपर्क होता, कुणी त्याच्याशी आर्थिक व्यवहार केले, त्याला मेसेज केले या सर्वांची चौकशी केली जाणार आहे.
याप्रकरणाचा तपास करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक एसआयटी प्रमुख म्हणून महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणी न्यायालयाच्या चौकशीतील हस्तक्षेपाविषयी सदस्य मुनगुंट्टीवार यांनी प्रश्न केला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीत न्यायालयाचा हस्तक्षेप नसतो असे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या सविस्तर निवेदनामुळे या प्रकरणातील संबधीत राजकारण्यांचे धाबे दणाणले आहे. चौकशीसाठी ‘एसआयटी’समोर पहिले कोणाचा नंबर लागतो याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.











