LPG And PNG: एलपीजी गॅस सिलेंडर पूरवठ्याला अडचणी येत असल्याने केंद्राने पीएनजी पूरवठा करण्यावर भर दिला आहे. वाहतूक क्षेत्र आणि घरगुती वापरासाठीचा पीएनजी आणि सीएनजीचा 100% पुरवठा केला जात असून, ग्राहकांना प्राधान्य दिले जात आहे. राज्ये- केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्रीय मंत्रालयांनी शहरी वायू इंधन वितरण सेवेच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या अर्जांना मंजुरी द्यावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. ‘पीएनजी’च्या आतापर्यत साडेतीन लाखाच्यावर जोडण्या करण्यात आल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने 18 मार्च रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना व्यावसायिक एलपीजीचा अतिरिक्त 10% साठा देण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी राज्यांनी एलपीजी सेवेवरून पीएनजी सेवेवरील दीर्घकालीन स्थित्यंतरासाठी मदत करावी, अशी अट केंद्र सरकारने ठेवली आहे. पीएनजी सेवेच्या विस्ताराच्या सुधारणात्मक उपाय योजनांतर्गत 10 राज्यांना अतिरिक्त व्यावसायिक एलपीजी साठा दिला जात आहे. याशिवाय, आणखी एका राज्याचा अर्ज विचारार्थ आहे. मागील एक आठवड्यात 110 क्षेत्रांमध्ये वायू इंधनाच्या 75,000 पेक्षा जास्त जोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मार्च 2026 पासून, 3.42 लाखापेक्षा जास्त पीएनजी जोडण्या कार्यान्वित झाल्या आहेत. याव्यतिरीक्त 3.7 लाखापेक्षा जास्त ग्राहकांनी नवीन जोडणीसाठी नोंदणी केली आहे.
पेट्रोलियम मंत्रालय पीएनजीसाठी राज्यांना प्रोत्साहन देत आहे, ग्राहकांना पाईपद्वारे गॅस उपलब्ध करून देण्यावर सरकारने जोर दिला आहे. त्यामुळे एलपीजी वितरणावर विसंबून राहू नये, यासाठी महापालिका आणि इंधन कंपन्या ग्राहकांना पीएनजी जोडण्या करण्याचे आवाहन करत आहे. सगळ्याचा शहरात पीएनजी नाही, शासन स्तरावर त्याचा विस्तार सुरू आहे.











