LPG Shortage News: एलपीजी टंचाईच्या बातम्या सुरू असून वेळेवर गॅस सिलेंडर भेटत नसल्याच्या नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहे, पेट्रोलियम आणि एलपीजी पुरवठ्याची परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित आणि नियंत्रणात असल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशभरातील सर्व किरकोळ इंधन केंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध आहे. देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीची कमतरता नाही, असे देखील मंत्रालयाने सांगितले आहे. विनाकारण घबराट निर्माण करणाऱ्या अफवांना बळी नये, असे आवाहन मंत्रालयाने नागरिकांना केले आहे.
.दरम्यान एलपीजीची कसलीही टंचाई नाही. मंत्रालयाने जारी केलेल्या ‘एलपीजी नियंत्रण आदेशाचे (LPG Control Order) अनुसरण करत असून देशांतर्गत रिफायनरी उत्पादन 40 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. यामुळे एलपीजीचे दैनंदिन उत्पादन 50 टीएमटी पर्यंत वाढले आहे, जे आपल्या एकूण गरजेच्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे; प्रत्यक्षात आपली एकूण दैनंदिन गरज साधारणपणे 80 टीएमटी इतकी आहे. परिणामी, एलपीजी आयातीची निव्वळ दैनंदिन गरज केवळ 30 टीएमटी पर्यंत कमी झाली आहे. याचा अर्थ असा की भारताला आयातीची जितकी गरज आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक उत्पादन भारत आता स्वतःच करत आहे.
देशांतर्गत उत्पादनाव्यतिरिक्त, 800 टीएमटी इतक्या एलपीजीचा कार्गो पुरवठा परदेशातून येणे निश्चित झाले असून, तो सध्या अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांतून भारताच्या दिशेने येत आहे. हा पुरवठा भारतातील 22 एलपीजी आयात केंद्रांवर उतरवला जाईल, ही संख्या 2014 मध्ये अस्तित्वात असलेल्या 11 केंद्रांच्या तुलनेत दुप्पट आहे. साधारणपणे एका पूर्ण महिन्याच्या पुरवठ्याची भक्कम व्यवस्था करण्यात आली आहे आणि अतिरिक्त खरेदीची प्रक्रिया देखील सातत्याने सुरू आहे. तेल कंपन्या दररोज 50 लाखांपेक्षा जास्त एलपीजी सिलिंडर्सचा यशस्वी पुरवठा करत आहेत. ग्राहकांनी घाबरून केलेल्या अतिरिक्त मागणीमुळे सिलिंडर्सची मागणी 89 लाखांपर्यंत वाढली होती; मात्र आता ती पुन्हा 50 लाखांच्या पातळीवर आली आहे. साठेबाजी किंवा काळाबाजार रोखण्याच्या उद्देशाने, राज्य सरकारांशी सल्लामसलत करून व्यावसायिक सिलिंडर्सचे वाटप 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. असे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.त्यामुळे आता नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच अफवा पसरविण्यावर कडक कारवाईचा इशारा देखील दिला आहे.










