Nashik News: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या १५० दिवसांच्या ई गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलिस आयुक्तालय गटात ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ उपक्रम राबविणाऱ्या नाशिक पोलिस आयुक्त कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा गौरव करण्यात आला. यावेळी माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आदी उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांचा कृती आराखड्याबाबत शासकीय कार्यालयांमध्ये ई –प्रशासन सुधारणा आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १५० दिवसांचा ई गर्व्हनन्स सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई ऑफिस, कार्यालयाचा डॅश बोर्ड, व्हॉटस ॲप, चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉक चेनचा वापर आणि भौगोलिक माहिती प्रणाली या सात घटकांवर सहभागी कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले होते. 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे (Quality Council of India) करण्यात आले होते. त्यात ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला उपक्रम’ राबविणाऱ्या नाशिक पोलिस आयुक्त कार्यालयाने सर्वाधिक 156.25 गुण मिळवून पोलिस आयुक्तालय गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त कार्यालयाने डिजिटल उपक्रम राबविले. नागरिकांशी थेट संवादाचे उपक्रम राबविले. त्यासाठी ई मीट वीथ सीपी, वॉक इन टूर, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य असे विविध उपक्रम राबविले. यामुळे पोलिस दलाच्या कामकाजात पारदर्शकता, गतिमानता येऊन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला.
राज्य शासनाने दिलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात नाशिक पोलिस दलाने प्रभावी कामगिरी बजावली. त्यामुळे राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाशिक पोलिस आयुक्तालय सदैव तत्पर आहे.
-संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक






