Nashik News: गुढीपाडवा मराठी नववर्ष शुभरंभानिमित्त नविन नाशिक परिसरात “नववर्ष स्वागत यात्रा” मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती. या यात्रेने धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडविले. तसेच आनंदी आणि निरोगी राहण्याचा संदेश ही देण्यात आला. सकाळी सुरू झालेल्या स्वागत यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत नववर्षाचे उत्साहात स्वागत केले.
गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, मंडळे, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. भारतीय संस्कृतीची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, सर्व समाजात एकात्मता निर्माण करणे आहे, या यात्रेचे उद्दिष्टे होते. यावेळी पारंपरिक वेशभूषेत साकारलेले विविध देखावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शिष्टमंडळ, राम-लक्ष्मण-सीता माता, खंडोबा महाराज तसेच लहान मुलांनी श्रीकृष्ण-राधा यांच्या वेशात सहभाग घेतला होता, ज्यामुळे वातावरण भक्तिमय आणि सांस्कृतीक झाले.
विशेष म्हणजे विविध हास्य क्लबच्या सदस्यांनीही या यात्रेत सहभाग घेत सकारात्मकता, आनंद आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. त्यांच्या उपस्थितीमुळे यात्रेला एक वेगळाच उत्साही आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. स्वागत यात्रा खुटवड नगर, पवन नगर, मटाले चौक, आदर्श नगर आणि वनश्री नगर आदी भागांतून सुरू झालेल्या सर्व यात्रा माऊली लॉन्स, डी.जी.पी. नगर-२, कामटवाडे येथे एकत्र येऊन समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी २१ लकी ड्रॉ काढून पैठणी आणि नेकलेस, नथ आदी बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती श्री. हेमंत राठी, उपमहापौर विलास शिंदे, महेश हिरे, नगरसेविका प्रतिभा पवार, कविता नाईक, सुवर्णा मटाले, नगरसेवक शरद फडोळ, दिलिप देवांग, या वर्षीचे अध्यक्ष सुनील कोटगी, कार्याध्यक्ष राजेंद्र फड, सचिव राजेश मालपुरे, कोषाध्यक्ष योगेश मांडे, शरद जाधव, अनिल चांदवडकर, श्रीवर्धन मालपुरे,तुषार चव्हाण, महेंद्र थोरात, प्रतिभा गोसावी, मोनीष मराठे, अभिषेक धामणे, ओंकार जगताप. सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कलाकार शीतल क्षीरसागर, अशोक फलदेसाई व अनुष्का गीते आदींची उपस्थिती होती.






