Nashik News: नाशिक रोड रेल्वे स्थानकाचे नामकरण नाशिक रेल्वे स्थानक असे करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्याने त्याला तीव्र विरोध करत मनसेचे शहर उपाध्यक्ष अॅड. नितीन पंडित यांनी मनसेतर्फे आयुक्त मनीषा खात्री यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
बेकायदेशीर नामकरण प्रस्ताव नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांत मागे घ्यावा, नामकरणाची कायदेशीर प्रक्रिया केली असल्यास तशी कागदपत्रे सादर करावीत अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून प्रस्तावावर स्थगिती आणू, असा इशारा नोटीसीत आहे. दिवाणी प्रक्रिया संहितेप्रमाणे खटला दाखल करण्यापूर्वी दोन महिन्यांची लेखी नोटीस महापालिका आयुक्तांना देण्यात आली आहे. नामकरण बेकायदेशीरपणे केल्यास दिवाणी व फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा नोटीसमध्ये आहे.
नोटीसचा आशय असा- नाशिक रोड हे प्रमुख रेल्वे स्थानक आणि उपनगर आहे. हे रेल्वे स्थानक मुंबई-भुसावळ मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेच्या विषय पत्रिकेतील विषय क्र. ४८ अन्वये नाशिक रोड रेल्वे स्थानकाचे नाव हे नाशिक रेल्वे स्थानक करण्यात यावे, असे डॉकेट प्रशासनामार्फत महासभेला पारित करण्यात आले. त्या वेळी सदरचा विषय महासभेत तहकूब ठेवण्यात आला होता. त्यानंतर हा विषय सभागृहात सदस्यांशी चर्चा न करताच या विषयाला मंजुरी देण्यात आली असल्याचे समजते. नाशिक रोडची एक स्वतंत्र ओळख असून येथील नागरिकांचा नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या नामकरण प्रस्तावाला तीव्र विरोध आहे. हे कृत्य नाशिक रोडचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. नाशिक रोडला दोन सरकारी प्रेस, दिवाणी व फौजदारी न्यायालय, विभागीय आयुक्त, अप्पर आयुक्त, रेल्वे आदी अति महत्वाची कार्यालये, मुक्तीधाम मंदिर सारखी धार्मिक स्थळे आहेत.
रेल्वे स्थानकाचे नाव बदलणे ही एक दीर्घ प्रक्रिया असून, त्याचा निर्णय केवळ महापालिका घेऊ शकत नाही. महापालिकेला रेल्वे स्थानकाचे नामकरण करायचे असल्यास कायदेशीर प्रक्रिया केली का हे स्पष्ट करावे. प्रथम महापालिका ठराव मंजूर करते. राज्य सरकार प्रस्तावाचे पुनरावलोकन करून तो केंद्र सरकारकडे पाठवता. केंद्रीय गृह मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि इतर विभागांकडून तपासणी केली जाते. गृह मंत्रालय ना हरकत प्रमाणपत्र जारी करते. राज्य सरकार नाव बदलासाठी राजपत्रात अधिसूचना जारी करते. रेल्वे स्थानकाचे नाव ठेवण्यापासून ते बदलण्यापर्यंतचा सर्व अधिकार केंद्र शासनाचा आहे. ही प्रक्रिया महापालिकेने पूर्ण केली का हे स्पष्ट होत नाही. नाशिक रोड रेल्वे स्थानकाचे नाव इंग्रज काळातील आहे. महापालिका हद्दीत रेल्वे स्थानक असल्यामुळे त्याचे नाव बदलण्याचा अधिकार आपल्याला असल्याचा महापालिकेचा चुकीचा ग्रह आहे. नियम पायदळी तुडवून नाशिक रोड रेल्वे स्थानकाचे नामकरण करणे हे बेकायदेशीर आहे.






