Mumbai News: जेष्ठ व्यासंगी इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे (२६) रोजी कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात पंचगंगा घाटावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या महिन्यापासून ते फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या जाण्याने इतिहासकार, साहित्यिक, राजकारणी आणि सामान्य वाचकांमध्ये शोककळा पसरली आहे.आपली संपूर्ण हयात मराठेशाहीचा दबलेला खरा इतिहास आधुनिक भारतासह जगासमोर आणण्यात त्यांनी घालवला.वयाच्या ८५ व्या वर्षी डॉ. पवार यांच्या निधनाने अवघा बहुजन समाजाचा इतिहास पोरका झाला आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह साहित्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ज्यांच्या व्यासंग आणि संशोधनपूर्ण मांडणीमुळे नव्या पिढीसाठी शिव-शाहू चरित्रांचा अमुल्य ठेवा उपलब्ध झाला. त्यांची उणीव भरून काढणे कदापि शक्य नसल्याच्या भावना सामन्यांमध्ये व्यक्त झाल्या आहे.
करवीरनगरीचे विधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जगाच्या पाठीवर नेवून नवी ओळख करून दिली, त्यांना आरक्षणाचे जनक असे म्हटले जाते, महाराणी ताराबाई यांच्यावर ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ हा प्रमाण ग्रंथ लिहून स्त्री-नेतृत्वाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. राजाराम महाराज, सेनापती संताजी घोरपडे यांचा मराठेशाहीतील बुलंद इतिहास त्यांनी सर्वांसमोर मांडला. गेल्या तीन चार दशकापासून त्यांनी अमूल्य इतिहासाचा ठेवा आपल्याला उपलब्ध करून दिला. गेल्या पाच दशकांपासून बहुजनांचा इतिहास बुलंद करणाऱ्या जयसिंगराव पवार यांच्यामुळेच राजर्षी शाहूंची गौरव गाथाही ग्रंथनिर्मितीमधून सर्व जगासमोर आली. डॉ. पवारांचे ग्रंथ अनेक भारतीय आणि परदेशी भाषांत अनुवादित झाले आहे. महाराष्ट्राची यशोगाथा सुद्धा जगासमोर पोहोचली आहे.
आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. पवार यांनी इतिहास संशोधन आणि अभ्यासाला वाहून घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या चरित्रांचा अनेक अंगांनी वेध घेणारी मांडणी त्यांनी केली.विशेषतः शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी इतिहास लेखन, संशोधन- प्रकल्पांना चालना दिली. त्यामुळेच शिवचरित्रासह,छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब ते महाराणी ताराराणी आणि राजर्षी छत्रपती शाहू यांच्याविषयी विपुल संदर्भ साहित्याची निर्मिती झाली. डॉ. पवार यांच्या पुढाकारामुळे राजर्षी शाहू छत्रपती यांचे कार्य इंग्रजीसह, अन्य विदेशी तसेच भारतीय भाषांमध्ये पोहोचले.यातून निर्माण झालेली ग्रंथसंपदा ही महाराष्ट्रासाठी संचित ठरणारे आहे. डॉ पवार यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्रातील व्यासंगी मार्गदर्शक हरपला आहे. ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनाने पवार तसेच त्यांच्या संशोधक विद्यार्थी परिवारावर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले.











