Nashik News: ‘रमजान ईद’ हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून प्रेम, सहकार्य आणि मानवतेचा संदेश देणारा सण असल्याचे गौरवोद्गार महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी यावेळी काढले तसेच मुस्लिम बांधवाना रमजान ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
Nashik News: रमजान ईद निमित्त नाशिक शहरातील ईदगाह मैदानावर मोठ्या उत्साहात नमाज पठण पार पडले. या पवित्र सणा निमित्ताने नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना सदिच्छा देत आनंद व्यक्त केला. यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, खासदार राजाभाऊ वाजे, माजी उपमहापौर तथा नगरसेवक प्रथमेश गीते, माजी विरोधी पक्ष नेत्या तथा नगरसेविका हेमलता पाटील, नगरसेविका नजिया अत्तार, म्हाडाचे अध्यक्ष नामदार रंजन ठाकरे, माजी सभागृह नेते डॉ. सुभाष देवरे, माजी नगरसेवक गुलजार कोकणी, बबलू खैरे,स्वप्नील पाटील यांच्यासह नाशिक शहर पोलीस उपायुक्त किरण चव्हाण व मोनिका राऊत माजी पोलीस उपायुक्त मकरंद रानडे,जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महापौर व उपमहापौर यांच्या हस्ते मुस्लिम धर्मगुरू नाशिक शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफीयांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच नमाज पठणासाठी उपस्थित मुस्लिम बांधवांनाही गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.शहरात बंधुभाव, शांतता आणि ऐक्य कायम राहावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.
रमजान ईदचे महत्त्व
रमजान महिनाभर उपवास (रोजा) पाळल्यानंतर येणारा ईद-उल-फित्र हा मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी नमाज अदा करून अल्लाहचे आभार मानले जातात. गरजूंना जकात (दान) देणे, बंधुभाव वाढवणे, तसेच क्षमा व सद्भावना जपणे हा या सणाचा मुख्य संदेश आहे.






