Pune News: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव ठेवण्यात येतात, आज राज्य शैक्षणिक संशोधन आणि परिषदेच्या सभागृहात शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत आरटीई प्रवेशाची सोडत काढण्यात आली. २५ टक्के खाजगी जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत पुण्यातील येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या शाळेला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. शाळेतील ६९ जागांसाठी २ हजार ९४ अर्ज दाखल झाले. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, सहसंचालक रमाकांत काठमोरे, एनआयसीच्या आदिती एकबोटे, एससीईआरटीच्या सह संचालक डॉ. कमलादेवी आवटे, पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनंदा वाखारे या वेळी उपस्थित होत्या.
तसेच पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. आर्थिक दुर्बल आणि सामान्य घरातील विध्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. दरम्यान शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले की, ८ हजार ७०१ शाळांमध्ये १ लाख १४ हजार ८२६ जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी २ लाख ८९ हजार ६०९ अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी आरटीई अंतर्गत ८८ हजारांहून अधिक प्रवेश झाले होते.या सोडतीनंतर लगेच दोन दिवसांत प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येऊन पात्र विद्यार्थ्याना प्रवेश सुरू केले जातील.
याप्रसंगी सिंह म्हणाले केवळ उच्च वर्गाच्या शाळा निर्माण होऊ नये, समावेशकता असावी हा या कायद्याचा मुख्य उद्देश्य आहे. गेल्या काही वर्षांत आरटीईमार्फत लाखो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. गेल्या काही वर्षांत काही गैरप्रकार लक्षात आले आहेत. त्यावर उपाययोजना करण्यात आली. खोटी माहिती दिलेल्या पालकांवर कारवाई करण्यात आली. प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवणारे दलाल निर्माण झाले आहेत. दलालांवर पालकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन ही केले. दरम्यान ही संपूर्णपणे ऑनलाइन चालणारी प्रक्रिया आहे. गैरप्रकार आढळल्यास तक्रार करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.










