Varangaon News: शेतकऱ्यांना अंधारात ढकलणाऱ्या विद्युत रोहित्र (डीपी) चोरांच्या टोळीवर वरणगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पथकाने शिताफीने सापळ रचत सिनेस्टाईल पाठलाग करुन रोहित्र चोरांच्या मुसक्या आवळल्या आहे. मध्यरात्रीच्या सिनेस्टाईल थरारक पाठलागानंतर सहा आरोपींना जेरबंद करण्यात आले असून डीपी व चारचाकी मालवाहू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वरणगाव परिसरात चोरीच्या घटना सातत्याने घडत आहे. घटनांमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवून सापळा रचला होता. बुधवाररी मध्यरात्री 12 च्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना पिंपळगाव खु. परिसरात एक बोलेरो मालवाहू वाहन (MH 19. Cy. 1974) संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने वेगाने पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी त्या वाहनाचा थरारक पाठलाग केला.
पोलिसांनी तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांना माहिती दिली. त्यांनी प्रसंगवधान दाखवत वरणगाव नागेश्वर मंदिर बोदवड मार्गावरून समोरून येत वाहनाला अडवले. वाहनाची तपासणी करताच चोरी केलेले विद्युत रोहित्र (डीपी) उघडकीस आले आणि संपूर्ण टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली. या कारवाईत अर्जुन सोनवणे, रविंद्र भिल, धिरज जोहरे, आरबाजशहा (रा. पिंपळगाव खुर्द) आणि इमरान शहा (रा.आर एन कॉलनी, भुसावळ) यांच्यासह एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 1.50 लाख रुपये किमतीचे डीपी आणि अंदाजे 5 लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन असा एकूण 6.50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या नेतृत्वाखाली गस्तीवरील पोलीस कर्मचारी साहेबराव कोळी, फिरोज पठाण, लतीफ तडवी, सुकराम सावकारे आणि गोपीचंद सोनवणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.






