Shiv Jayanti 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने शिवनेरीसह छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित झाले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शिवनेरीवर विशेष प्रेम होते. त्यांनी आणि आम्ही शिवरायांच्या कार्याची साक्ष असलेले राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त केले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा 2030 मध्ये होणारा 400 वा जयंती सोहळा अतिशय भव्य आणि जगभरचे डोळे दिपतील, असा साजरा केला जाणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत शिवनेरी येथे पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून शिवजन्म सोहळा झाला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी, जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिवनेरीसह छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित झाले. त्यास 27 देशांनी एकमताने त्यास मान्यता दिली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी संबंधित प्रमाणपत्र स्वीकारले. त्यामुळे शिवरायांचे किल्ले आता अधिकृतपणे जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरवले गेले आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही शिवरायांच्या कार्याची साक्ष असलेले राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला. तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात समता, सन्मान, न्याय आणि स्त्रीसुरक्षा यांना प्राधान्य होते. शेतकरी समाधानी राहील, अन्याय-अत्याचार होणार नाहीत, अशी राज्यव्यवस्था त्यांनी उभी केली, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज भारताचा इतिहास आणि भूगोलही वेगळा असता. अनेक राजे-राजवाडे मोगलांच्या आधिपत्याखाली काम करत असताना आई जिजाऊंनी घडविलेल्या छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानाला नवी दिशा दिली.










