LPG Shortage: मध्यपूर्वेतील संघर्षामुळे भारतासह जगावर इंधन आणि गॅस तुटवड्याचे संकट उभे असताना एलपीजी पुरवठ्याबाबत टेन्शन वाढवणारी अपडेट समोर आली आहे. एलपीजी गॅस पुरवठ्याचा तुटवडा पुढील तीन ते चार वर्षे भासू शकतो, अशी भीती सरकारी अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
उत्पादन प्रकल्पांना किती प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत स्पष्टता नसल्याने पुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता तात्पुरती आहे की दीर्घकालिन हे सांगता येत नाही, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, भारत एलपीजी पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात पश्चिम आशियावर अवलंबून आहे. दुरस्तीसाठी तीन वर्षांपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस पुरवठा पश्चिम आशियातून होतो. पण, सध्या या भागात संघर्ष सुरु असल्यामुळे समुद्री वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच, अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी केल्याने पुरवठ्यावर आणखी परिणाम झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने हल्ले केल्यानंतर इराणने प्रत्युत्तरात विविध उर्जा प्रकल्पांवर हल्ले केले आहेत. यात उत्पादन प्रकल्पांना मोठे नुकसान झाले आहे. पुरवठादारांनी दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीसाठी कदाचित तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे, असे वृत्त मनीकंट्रोल या संकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केली आहे.









