Amalner News: ऊसतोडीच्या कामाचे आमिष देत पुणे जिल्ह्यात नेऊन अमानुष पद्धतीने काम करून घेतलेल्या अमळनेर तालुक्यातील ८ मजुरांची अखेर सुटका करण्यात आली आहे. जन साहस फाउंडेशनच्या तत्पर हस्तक्षेपामुळे जळगाव व पुणे जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत या मजुरांना सुखरूपपणे त्यांच्या गावी पोहोचवले.
पळासदडे व हिंगोणे (ता. अमळनेर) येथील मजुरांना दौंड तालुक्यात ऊसतोडीच्या कामासाठी नेण्यात आले होते. मात्र तेथे त्यांना ऊसतोडीसोबतच इतर गुन्हाळ कामांमध्ये जबरदस्तीने जुंपण्यात आले. मजुरीची रक्कम न देता, उलट मोबदला मागितल्यावर धमकावले जात होते. मजुरांची हालचाल रोखण्यासाठी त्यांच्या दुचाकीही ताब्यात घेण्यात आल्याचे उघड झाले.
या अन्यायाविरोधात संदीप हिलाल मोरे व विमलबाई पंडित भिल यांनी जन साहसच्या हेल्पलाईनवर संपर्क साधत मदत मागितली. त्यानंतर संस्थेने जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे व पुणे जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांच्याकडे तक्रार नोंदवली. प्रशासनाने तत्काळ महसूल, कामगार व पोलीस विभागाला संयुक्त कारवाईचे आदेश दिले.
यानंतर जन साहसच्या कार्यकर्त्यांसह दौंड प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वाखाली बचाव पथकाने घटनास्थळी धडक देत मजुरांची सुटका केली. एसडीएम कार्यालयात पंचनामा व जबाब नोंदवून सर्व मजुरांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी पाठवण्यात आले. तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी शासकीय योजनांबाबत चर्चा करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या मजुरांमध्ये हिलाल बन्सी मोरे, सुशीलाबाई हिलाल मोरे, सुनील पंडित सोनवणे, भारती सुनील सोनवणे, राकेश हिलाल मोरे, वैष्णवी, आयुष व गायत्री सोनवणे यांचा समावेश आहे.







