Bhusawal News: भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष गायत्री चेतन भंगाळे यांनी त्यांच्या विरोधात खोटे व बनावट कागदपत्र सादर करून जात पडताळणी प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोप करत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यापत्नी विरोधात पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे केवळ भुसावळच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
गायत्री भंगाळे या सध्या भुसावळ नगरपालिकेत नगराध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या जात वैधतेसंदर्भातील दावा सध्या जळगाव येथील जात पडताळणी समितीसमोर सुनावणीसाठी प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर, नगराध्यक्ष निवडणुकीत त्यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांनी त्यांच्या जात दाव्याला आव्हान देण्यासाठी काही कागदपत्रे सादर केल्याचे समोर आले आहे.
नगराध्यक्षा भंगाळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सावकारे व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी संगनमताने उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील फत्तेपूर बजेरिया या ठिकाणी जाऊन काही कागदपत्रे मिळवली. त्यानंतर ही कागदपत्रे येथील जात पडताळणी समितीकडे पुराव्याच्या स्वरूपात सादर करण्यात आली.
समितीच्या दक्षता पथकाने या कागदपत्रांची तपासणी करून अहवाल सादर केला असला तरी, त्या अहवालात दाखवलेली शेती व संबंधित मालमत्ता ही भंगाळे किंवा त्यांच्या नातेवाईकांची नाही. ती पूर्णपणे इतर व्यक्तींची असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
कामता प्रसाद नारायण नावावरुन वाद
भंगाळे यांच्या तक्रारीनुसार अहवालात नमूद केलेली शेती तसेच जमीन व इतर मालमत्ता या भंगाळे किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या नसून पूर्णपणे इतर व्यक्तींच्या नावावर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे संबंधित कागदपत्रांची सत्यता संशयास्पद ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेषतः, या कागदपत्रांमध्ये कामता प्रसाद नारायण या व्यक्तीचे नाव नमूद असून त्यांचा भंगाळे कुटुंबाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भंगाळे यांनी पुढे नमूद केले आहे की, नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेत मुद्दाम चुकीची माहिती तयार करून ती अधिकृत प्रक्रियेत सादर करण्यात आली. कामता प्रसाद नारायण यांचा जन्म 1959 साली झालेला असून, भंगाळे यांच्या आजोबांचा जन्म 1924 साली झाला आहे. त्यामुळे दोन्ही व्यक्तींमध्ये कोणताही कौटुंबिक संबंध असण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
याशिवाय, इतर व्यक्तींच्या मालमत्तेची कागदपत्रे स्वतःच्या नावाशी जोडून खोटा पुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीतून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे केवळ त्यांच्या जात पडताळणी प्रक्रियेवर परिणाम होत नाही, तर संबंधित निष्पाप नागरिकांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले आहे.
या संपूर्ण प्रकरणात रजनी संजय सावकारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचा आरोप करत भारतीय न्याय संहितेच्या कलम 420 (फसवणूक) आणि 120 (ब) (कटकारस्थान) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.







