Maharashtra Vidhan Parishad Election 2026: निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.
येत्या 13 मे 2026 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यानुसार, उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा), नीलम गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट), गोपीचंद पडळकर (भाजप), रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप), राजेश राठोड (काँग्रेस), प्रवीण दटके (भाजप), रमेश कराड (भाजप) या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येईल.
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मतं असल्यामुळे महायुतीने आणखी उमेदवार देण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात
दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.
विधानसभेत कोणाचे संख्याबळ किती?
भाजपा- 132 – 1 = 131
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 – 1 = 40
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जनसुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2











