Jalgaon News: संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नसून ते भारतीय समाजाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर उभे करणारे मार्गदर्शक तत्त्व आहे. असे सांगून संविधानामुळेच आज देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि संधी मिळाली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, जळगाव यांच्या वतीने १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारी सभा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरांतील नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम स्थळी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे होते. कार्यक्रमाची सुरुवात पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर विविध मान्यवरांनी आपले विचार मांडत बाबासाहेबांच्या कार्याची आठवण करून दिली. या प्रसंगी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टी, अभ्यासू वृत्ती आणि समाजातील वंचित घटकांविषयी असलेल्या बांधिलकीमुळे भारतीय संविधानाची निर्मिती शक्य झाली. संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नसून ते भारतीय समाजाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर उभे करणारे मार्गदर्शक तत्त्व आहे.
ते पुढे म्हणाले की, संविधानामुळेच आज देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि संधी मिळाली आहे. जात, धर्म, लिंग किंवा आर्थिक स्थिती यापलीकडे जाऊन प्रत्येकाला न्याय मिळावा, ही बाबासाहेबांची भूमिका होती. संविधानाच्या अंमलबजावणीनंतर खऱ्या अर्थाने नव्या भारताचा उदय झाला असून, या नवभारताच्या उभारणीत प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्त्वाची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले
उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. ते म्हणाले की, बाबासाहेबांनी समाजातील विषमता दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा मार्ग दाखवला. सपकाळे यांनी उपस्थितांना आवाहन केले की, बाबासाहेबांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे. समाजात समता, न्याय आणि बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजपरिवर्तनासाठी कटिबद्ध राहणे हीच बाबासाहेबांना खरी अभिवादन ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, त्यांनी केवळ संविधानच दिले नाही, तर समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. त्यांच्या विचारांमुळे लाखो लोकांना शिक्षण आणि प्रगतीची संधी मिळाली. त्या पुढे म्हणाल्या की, आजच्या पिढीने बाबासाहेबांच्या कार्याचा सखोल अभ्यास करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आवश्यक आहे. समाजात अजूनही काही ठिकाणी असमानता दिसून येते, ती दूर करण्यासाठी बाबासाहेबांचे विचार मार्गदर्शक ठरतात. त्यांच्या कार्याची जाणीव प्रत्येक नागरिकाला करून देणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. अनेक कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित आपले विचार मांडले. कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व पटवून देणारे घोषवाक्ये आणि संदेशही देण्यात आले. सभेचा शेवट आभार प्रदर्शनाने झाला. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्प केला.
एससी प्रवर्गाचे उपवर्गीकरणाचा हा डाव सर्व अनु.जातींनी हाणून पाडला पाहिजे,समाजा -समाजात फूट पाडण्याचा हा कुटील डाव आहे.जातीनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत उपवर्गीकरण होऊच शकत नाही.आरक्षणाचा लाभ घटनात्मक असून उपवर्गीकरणाचा घाट म्हणजेच संविधानाची पायमल्ली आहे.आपण गाफील राहून चालणार नाही.आनंद -जल्लोषात भीमजयंती साजरी करतांना,सजग राहून या उपवर्गीकरणा विरोधात लढा मजबूत करून लाखोंच्या संख्येने ईमेल करा ,असे आवाहन चळवळीचे विचारवंत प्रा.डाॅ.सत्यजित साळवे यांनी केले.
अशा प्रकारे जळगाव येथे बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यातआली. याप्रसंगी आमदार राजू मामा भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज भाऊ चौधरी, पोलीस अधीक्षक माननीय महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक माननीय संदीप गावित साहेब, महानगरपालिका आयुक्त माननीय ज्ञानेश्वर ढेरे साहेब, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय मुकुंद भाऊ सपकाळे , ईकरा संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार सर,शहर अभियंता माननीय योगेश बोरवले, साहेब ,प्रतिभाताई शिंदे,नगरसेवक अनिल अडकमोल,राजू भाऊ मोरे, विधीज्ञ ॲडवोकेट राजेश झाल्टे, प्रा.डाॅ. सत्यजित साळवे सर, डॉ . मिलिंद बागूल, बापूराव पान पाटील, सुनील सोनवणे,आर.टी.सोनवणे,प्रा.किसन हिरोळे यांनी मनोगत व्यक्त केले.सर पोलीस उपअधीक्षक नितीन गनापुरे साहेब नीलू ताई इंगळे संध्याताई तायडे भारतीताई रंधे, आप्पासाहेब गुलाबराव देवकर, संजय दादा पवार,दिलीप भाऊ सपकाळे, वाल्मीक भाऊ सपकाळे, वाल्मीक सपकाळे, भाऊसाहेब भारत सोनवणे,शहर पोलीस स्टेशनचे पीआय सागर शिंपी, साहेब राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माननीय संजय पवार साहे, माननीय शिवचरण भैय्या, नगरसेवक निलेश तायडे, काजल वाघ, आकाश सपकाळे, समाधान सोनवणे, सतीश गायकवाड ,दिलीप अहिरे ,सुभाष सपकाळे यांच्या आंबेडकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन हरिचंद्र सोनवणे सर आभार प्रा. प्रीतीलाल पवार यांनी केले.








