Jalgaon News: अटलांटा कंपनीने 41 कोटींचा अपहार केल्याचा आरोप जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केला आहे. त्यांनी अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि.च्या संचालकांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार जळगाव शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, कंपनीवर फसवणूक, विश्वासघात आणि आर्थिक अपहाराचे आरोप करण्यात आले आहेत.
तक्रारीनुसार, अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. यांना सन 1997 मध्ये जळगाव नगरपरिषदेकडून रस्ते डांबरीकरणाचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, कंत्राट मिळविताना कंपनीने भ्रामक माहिती देत काम पूर्ण करण्याची क्षमता नसतानाही कंत्राट मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कंपनीने कंत्राटानुसार काम वेळेत पूर्ण केले नाही, तसेच वारंवार मुदतवाढ घेऊनही प्रकल्प अपूर्ण ठेवला. याशिवाय कंपनीला देण्यात आलेल्या सुमारे 10.35 कोटी रुपयांच्या मोबिलायझेशन ॲडव्हान्सचा गैरवापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आवश्यक बँक गॅरंटी न देणे हेही गंभीर अनियमिततेचे लक्षण असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच, कंपनीकडे महापालिकेची सुमारे 4.71 कोटी रुपयांची थकीत रक्कम असून, त्यावर गेल्या 24 वर्षांपासून चक्रवाढ व्याज लावल्यास एकूण नुकसान सुमारे 41.34 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. ही रक्कम जाणीवपूर्वक न भरता कंपनीने महापालिका व जनतेची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2) आणि 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करून नुकसानभरपाई वसूल करावी आणि आवश्यक असल्यास मालमत्ता जप्त करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.











