Chopda News: शहरातील नारायणवाडी परिसरातील धरणगाव नाक्याजवळ सोमवारी सकाळी ४५ वर्षीय व्यक्तीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृताचा गळा कापून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मृताच्या खिशात मिळालेल्या एका लग्नपत्रिकेवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, सदर मृतदेह तारामती नगर येथील रहिवासी प्रदीप राजू माळी यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. (Chopda Crime)
नेमकी घटना आणि अशी पटली ओळख
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी शहरातील धरणगाव नाक्याजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसल्याची बातमी पोलिसांना मिळाली. या नंतर क्षणाचाही विलंब ना करता पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळी दाखल झाले, तर मृताच्या गळ्यावर वार केल्याचे दिसून आले. सुरुवातीला या व्यक्तीची ओळख पटत नव्हती, मात्र पोलिसांसमोर तपासाची चक्रे फिरवली,तसेच मृतदेहाची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्या खिशात एक लग्नपत्रिका सापडली. या पत्रिकेतील पत्ता आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी मृत व्यक्ती तारामती नगर येथील प्रदीप माळी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच फॉरेन्सिक टीमकडून तपासणी केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या.
दरम्यान या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जळगाव येथून फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आले होते. या पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. खून नक्की कोणत्या कारणातून झाला आणि यात कोणाचा हात आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसेच चाळीसगाव परिमंडळाच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी ही घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली, दरम्यान प्रदीप माळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकाराची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
एक संशयित ताब्यात
दरम्यान घटनेप्रकरणी एक संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. प्रदीप माळी हा कष्टाळू युवक असल्याची माहिती समोर आली. त्याने किराणा दुकानातं काम केलेले आहे. आता तो छोटीशी पान टपरी टाकून आपला उदर्निवाह चालवत होता. मात्र रात्री हुडको कॉलनीतून अन्य दोघांबरोबर बाहेर चर्चा परिसरात होती. त्याचा “खून का झाला” हे मात्र गुलदस्त्यात आहे. दरम्यान संशयितांना ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातलगांनी म्हटले आहे.








